Cinema Halls Reopen : शहरातील नाट्यगृहे व चित्रपटगृहे 22 पासून सुरू – महापालिकेचे आदेश

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील नाट्यगृहे व चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. हे आदेश पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतही लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहेत. गेल्या आठवड्यात महापालिकेने महाविद्यालये देखील सुरू करण्याची परवानगी दिली. गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार राज्य शासनाने 11 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर महापालिका अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी बुधवारी शहरातील नाट्यगृह व चित्रपटगृह खुली करण्यासंदर्भात आदेश काढले.

या आदेशानुसार नाट्यगृहे, चित्रपटगृहे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करताना या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाला घ्यावी लागणार आहे. तसेच ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, चित्रपटगृहात लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांसह 18 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना प्रवेश असेल, प्रवेशद्वारावर प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करावे, दोन्ही ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक, स्वच्छतागृह, मोकळ्या जागेचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, कलाकार व कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासमी तसेच कोरोना प्रतिबंधक साधनांचा वापर करावा आदी नियमांचा समावेश आहे.

तसेच, कलाकार कक्षात कलाकारांशिवाय इतर कोणालाही जाण्याची परवानगी नसावी. नाटकापूर्वी किंवा संपल्यानंतर रंगमंचावर जाण्यास प्रतिबंध घालावा, अभिनेत्यांनी रंगभूषा व केशभूषा स्वतः करण्याचा प्रयत्न करावा, रंगभूषा, केशभूषा करणार्‍या व्यक्तींनी फेसशील्ड, पीपीई किट घालावे. नाटकासाठी वापरल्या जाणार्‍या प्रत्येक गोष्टीचे, साहित्याचे वेळोवेळी पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.