PMPML : येरवडामार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा पीएमपीएमएलने पुन्हा सुरु करण्याची नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत येरवडा मार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा बंद केली आहे. पीएमपीएलच्या या निर्णयाने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मोशी परिसरातील नागरिक करत आहेत.

मोशी, चाकण परिसरातून पुणे शहरात जाण्यासाठी वाकडेवाडीमार्गे चाकण ते पुणे स्टेशन किंवा मोशी ते पुणे स्टेशन या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तरीही प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

मोशी परिसरातून कामासाठी पुण्यात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून राजगुरुनगर ते पुणे स्टेशन, चाकण ते मनपा अशी नियमित बससेवा सुरू होती. राजगुरुनगर ते पुणे स्टेशन हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा मार्ग पीएमपीएमएलने जाहीर केला होता. या मार्गावर प्रवासी संख्येत देखील वाढ होत होती.

राजगुरुनगर येथून आलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक (PMPML) होती. त्यामुळे ही बस मोशी आणि इतर बस थांब्यावर थांबत नव्हती. त्या विरोधात मोशीतील नागरिकांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर पीएमपीएलने मोशी ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे बस सेवा सुरू केली होती. यामुळे मोशी परिसरातील नागरिकांना पुणे स्टेशनला इतर ठिकाणी जाणे सोईस्कर झाले होते. परंतु आता ही बस सेवा बंद केल्याने मोठी गैरसोय होत आहे.

मोशीतील नागरिक आनंद पाटील म्हणाले की, “शेअर रिक्षाने मी भोसरीला जातो व तेथून पीएमपीएमएल बस टर्मिनस वरून पुणे स्टेशन बसने पुणे स्टेशनला जातो. येताना राजगुरूनगर बसने मोशीला येतो. पण यामुळे जास्त वेळ व पैसे खर्च होतात. त्यामुळे पीएमपीएमएलने येरवडा मार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा पुन्हा सुरु करावी.”

संतोष शिंदे म्हणाले की, “पीएमपीएमएलला पैसे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PMPML) व पुणे महानगरपालिका पुरवते. त्यामुळे पीएमपीएमएलने पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील नागरिकांना प्रथम बस सेवा पुरवावी आणि नंतर इतरांना पुरवावी.”

Railway Police Force : पुणे लोहमार्ग पोलीस दलातील शिपाई पदाच्या 124 जागांसाठी सुरु होणार भरती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.