Pune News : परदेशातून आलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये करणार क्वारंटाइन

एमपीसी न्यूज : परदेशातून आलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र याचा पूर्ण खर्च नागरिकांना करावा लागणार आहे. याच बरोबर पालिका कोविड केअर सेंटर मध्ये देखील या नागरिकांनाची क्वारंटाइन व्यवस्था करत आहे.

परदेशांतून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करायचे आहे. त्यांना महापालिकेच्या ‘सीसीसी’मध्ये रहायचे नसेल, तर त्यांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. त्याची सोय महापालिकेने केली आहे, मात्र याठिकाणी रहायचे असेल तर संबंधित प्रवाशाला स्वत: हा खर्च उचलावा लागणार आहे. करोना काळातही अशीच सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आताही सोय करण्यात आली आहे.

करोनाचे रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने सर्व ‘सीसीसी’ बंद केले. परंतु बाणेर आणि नायडू हे सुरू ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही काही रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र याशिवाय येरवडा येथील संत ज्ञानेश्‍वर येथील, हडपसर येथील आणि अन्य काही ठिकाणचे ‘सीसीसी’ एका दिवसात सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ओमायक्रॉन’बाधित काही रुग्ण आढळले आहे. याविषयी नागरिकांनी घाबरू नये. आरोग्य विभागाच्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे. विशेषतः मास्कचा वापर, सोशल डिस्टन्ससह इतर नियम कटाक्षाने पाळावेत. राज्य सरकारच्या आदेश येताच पुढील अंमलबजावणी केली जाईल. शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रामुख्याने सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. या काळात प्रसारमाध्यमांत येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्‍वास ठेवावा. कोणीही अफवा पसरवू नयेत; तसेच अनधिकृत माहितीवर विश्‍वास ठेऊ नये – डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.