Pimpri: महात्मा फुलेनगर, लांडेवाडी मधील नागरिकांना क्वारंटाइनसाठी MIDC  केंद्रातील जागा घ्या – जितेंद्र ननावरे

Citizens of Mahatma Phulenagar, Landewadi take place in MIDC center for quarantine - Jitendra Nanavare

एमपीसी न्यूज –  प्रभाग क्रमांक २० महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहत आहे. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी किमान दोन हजार घरे व अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी एक रुग्ण पॉजिटिव्ह सापडला आहे. पुढील संभाव्य धोका लक्षात घेता परिसरामधील  नागरिकांना  MIDC महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये  क्वारंटाइनसाठी  जागा उपलब्ध करावी,  अशी मागणी माजी नगरसेवक  जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात ननावरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे.

परंतु, दाट लोकवस्ती मध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून त्या परिसरामध्ये योग्य उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे वाटते. शहरातील मोठ्या दाट लोकवस्ती पैकी महात्मा फुलेनगर झोपडपट्टी आहे.

महात्मा फुलेनगर झोपडपट्टी व  लांडेवाडी मध्ये 50  % कुटुंबातील सदस्य सार्वजनिक शौचालयचा वापर करतात. या ठिकाणी अत्यंत छोटे – छोटे गल्ल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांचा सहज संपर्क होवून कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

सध्या महात्मा फुलेनगर मध्ये पंचवीस संशयित नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. परंतु, 14  दिवस घरी राहणे बंधनकारक असतांना हे नागरिक अत्यंत बेपार्वाहीने समाजामध्ये वावरतांना दिसून येत आहेत. क्वारंटाइन नागरिकांना वारंवार सांगूनही कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता बिन्दास्त पणे फिरतांना दिसतात.

त्यामुळे येथील परिस्थितीचा योग्य आढावा घेवून महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये  क्वारंटाइन नागरिकांना जागा उपलब्ध करून दिल्यास आनंदनगर झोपडपट्टी सारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असे ननवरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.