Pimpri News : वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे नागरिक आता पेट्रोल, डिझेलवर चालणा-या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीत एक हजार 634 इलेक्ट्रिक वाहनांची पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद झाली आहे. तर पेट्रोल, डिझेलवर चालणा-या 37 हजार 998 वाहनांची नोंदणी झाली आहे.

मार्च 2020 मध्ये कोरोना साथीने महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, आस्थापना, कार्यालये बंद करण्यात आली. नागरिकांना घराबाहेर फिरण्यावर बंधने आली. कंपन्या, कार्यालये बंद झाल्याने काम थांबले. अनेकांचे पगार रखडले आणि त्याचाच परिणाम वाहन खरेदीवर देखील झाला. कोरोना काळात वाहनांची खरेदी अत्यंत कमी झाली.

एप्रिल ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 72 हजार 656 वाहनांची नोंदणी झाली होती. तर याच कालावधीत 2020 मध्ये ही संख्या 25 हजार 341 वर पोहोचली. कोरोना साथीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आणि सर्व बाबी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. अजूनही कोरोना साथ पूर्णपणे गेली नसून सर्व बाबी देखील अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेल्या नाहीत. परंतु काही प्रमाणात का होईना पण व्यवसाय, नोक-या सुरु झाल्याने आर्थिक गणिते पुन्हा जुळू लागली आहेत. त्यामुळे यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 37 हजार 998 वाहनांची नोंदणी झाली.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधन दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले. पेट्रोल, डिझेल शंभरी पार गेले. तर गॅस सव्वानऊशेच्या पुढे गेला. आधीच कोरोनाने आर्थिक आघात केला, त्यात आता इंधन दरवाढ होत असल्याने नागरिकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीत एक हजार 634 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहने सर्वाधिक आहेत. सहा महिन्यात एक हजार 490 दुचाकी, 101 कार, तीनचाकी मालवाहतूक 29 आणि इतर 14 वाहनांची नोंद आहे.

दीड वर्षात एकाही स्कुल बसची नोंदणी नाही

कोरोना साथ मार्च 2020 मध्ये आली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसातच शाळा, महाविद्यालये देखील बंद करण्यात आली. त्यामुळे स्कुल बस एका जागी थांबल्या. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 26 स्कुल बसची नोंदणी झाली आहे. त्यानंतर एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2021 या दीड वर्षाच्या कालावधीत एकाही स्कुल बसची नोंदणी झालेली नाही.

दस-याच्या पंधरवड्यात पाच हजार वाहने रस्त्यावर

विजया दशमी दसरा या दिवशी वाहन खरेदीला नागरिक पसंती देतात. त्यामुळे या दिवशी वाहनांची विक्रमी नोंदणी होते. अनेकजण दस-याच्या अगोदर देखील दहा ते पंधरा दिवस वाहने खरेदी करतात. 15 ऑक्टोबर रोजी दसरा झाला. एक ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चार हजार 985 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दोन हजार 749 दुचाकी, एक हजार 762 कार, जीप तर 474 अन्य वाहनांचा समावेश आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2021 मध्ये नोंदणी झालेली वाहने (इलेक्ट्रिक वाहने)

  • एप्रिल – 694 (63)
  • मे – 3855 (61)
  • जून – 5914 (207)
  • जुलै – 10291 (455)]
  • ऑगस्ट – 9385 (426)
  • सप्टेंबर – 7859 (422)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.