Pimpri News : नागरिकांनी बाहेर विसर्जन करू नये; प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी (रविवारी, दि. 19) सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णतः थांबलेला नाही. त्यामुळे एक चूक देखील कोरोना रुग्णसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा, उदा. मेडिकल, दूध वितरण केंद्र वगळता) रविवारी बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल, रेस्टोरंट, फूडकोर्ट (मॉल्समधील वगळून) चालू आहेत.

सार्वजनिक मंडळांनी मंडपात कृत्रिम हौद तयार करून त्यात गणेश विसर्जन करावे. नागरिकांनी बाहेर येऊन गणेश विसर्जन करू नये, असे देखील प्रशासनाने सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व प्रभागांमध्ये मूर्ती संकलनासाठी वाहने तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून मूर्ती संकलन करून त्याचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी घरातल्या घरात अथवा मूर्ती संकलन, मूर्ती दान करून गणेश विसर्जन करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.