Pimpri News : शहरात ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – ईद ए-मिलाद म्हणजे प्रेषित मोहंम्मद पैगंबर यांची जयंती आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करत आप-आपल्या परिसरात जयंती साजरी करण्यात आली. यंदा कोणतीही मिरवणूक काढली नाही.

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटी, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे मोहंम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार अनेक निर्बंध होते. पिंपरी-चिंचवड शहरात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती मस्जिद, मदरसा असलेल्या भागात कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात यावी असे आवाहन केले होते.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील आपापल्या परिसरात सामाजिक संस्था, मदरसा, मशिदीच्या व्यवस्थापकांनी मुस्लिम अनुयायींना सरबत, अन्नदान, फळ वाटप आदी सार्वजनिक उपक्रमे राबवून जयंती साजरी केली. कोरोना नियमांचे पालन केले.

थेरगाव येथील मयूर कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने सुमारे एक हजारहून अधिक जणांना अन्नदान कार्यक्रम करण्यात आला. अनेक ठिकाणी मस्जिद व मदरसामध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी नमाज पठणाच्यावेळी मुस्लिम अनुयायांनासमवेत अल्लाहजवळ कोरोना या जीवघेणा विषाणुचा कायमस्वरूपी उच्चाटन व्हावे, यासाठी दुवा अदा केली.

दरवर्षी मोहंम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त पिंपरी येथील लतिफिया मशिदीपासून अल्लाहची प्रार्थना करून मिरवणूकचा प्रारंभ करून डिलक्स चौक, जमतानी चौक, गेलॉर्ड चौक, साई चौक, शगुन चौक, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पर्यंत काढण्यात येत असे.

जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून युवकांनी मिरवणूकीत सामील झालेल्या मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी, पेय जल, सरबत आदींचे वाटप केले जात होते. यात उंट, घोडे, दुचाकी, चारचाकी वाहनांवर मक्का मदिनाची प्रतिकृती समवेत मिरवणुकीद्वारे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत काही हजार मुस्लिम अनुयायी सहभाग घेत होते. यंदाच्यावर्षी कोरोनाच्या नियमांमुळे असे दृष्य मात्र दिसले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.