Pimpri News: शहरवासीयांसाठी 15 दिवसात मिळणार वाढीव 100 एमएलडी पाणी – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – आंद्रा धरण योजनेतून इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यासाठी निघोजे, तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे व विद्युत पुरवठ्याचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर चिखली केंद्रास 100 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील भागात पाण्याचे वितरण केले जाईल. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून त्या भागात होणारा पाणीपुरवठा दुसरीकडे वळविला जाईल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. अडीचवर्षे पूर्ण होत आले. तरी, शहरवासीयांना दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. वाढीव 100 एमएलडी पाणी मिळाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करु शकत नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती.

आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे व विद्युत पुरवठ्याचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे महापालिकेचा आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केली जाणार आहे. समाविष्ट गावांना तेथून पाणीपुरवठा केला जाईल.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, ”निघोजे अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दोन्ही केंद्रांना वीजपुरवठ्यासाठी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वीजजोड घेतला जाणार आहे. चिखली केंद्रास पाणी उपलब्ध झाल्यानंतर तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ते शुद्धीकरण प्रक्रिया नियमितपणे सुरू झाल्यानंतर चिखली परिसरातील भागात ते पाणी  पुरविले जाणार आहेत. त्यानंतर निगडी सेक्टर क्रमांक 23 येथून त्या भागास होणारा पाणीपुरवठा शहरातील इतर परिसरात वळविला जाणार आहे. त्यामुळे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.