Pimpri : शहरातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार, यांत्रिकीकरणाच्या विरोधात सफाई कामगारांचे बुधवारपासून कामबंद आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याचा प्रश्न पुन्हा एखदा पेठण्याची चिन्हे आहेत. शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याला विरोध करण्यासाठी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी येत्या बुधावारपासून  बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून शहरातील स्वच्छता, कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची   चिन्हे आहेत. शहरातील रस्त्यावर कच-याचे ढिग साचण्याची भिती आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत सात वर्ष कालावधीसाठी 647  कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्याला स्वयंरोजगार संस्थेचा विरोध आहे. यांत्रिकीकरणामुळे कंत्राटी पद्धतीने घेतलेले 68 स्वयंरोजगार संस्थेच्या 1800  कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यासाठी सफाई कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.

यांत्रिकीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सफाई कर्मचा-यांनी गुरुवारी (दि.20) महापालिका मुख्यालयाला घेराव घातला होता. अधिकारी, पदाधिका-यांना कोंडून ठेवले होते. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) सर्वपक्षीय पदाधिकारी, स्वयंरोजगार संस्थांना चर्चेसाठी बोलविले होते. शहर स्वयंरोजगार सेवा सह संस्था फेडरेशनचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे, सचिव गोरखनाथ पवार, संचालक प्रल्हाद कांबळे, सविता खराडे यांच्यासह शिवसेने गटनेते राहूल कलाटे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे बैठकीला उपस्थित होत्या. परंतु, आयुक्तांनी निविदा रद्द करण्यास असमर्थतात दर्शविली.

स्वच्छता, साफसफाईचे काम स्वयंरोजगार, बेरोजगार संस्थांना देणे बंधणकारक आहे. मात्र, यांत्रिकी पद्धतीने सफाईची निविदा काढून महापालिकेने या कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा घाट घातला आहे. शहरातील मोठे रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी हरकत नाही. परंतु, छोट्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करणे सोयीस्कर ठरणार नाही. तरी देखील महापालिकेने ही निविदा काढली आहे. त्यामुळे ही निविदा त्वरीत रद्द करावी. अन्यथा बुधवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.