Pimpri News: चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा – संजोग वाघेरे‌

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शासनाच्या अध्यादेशानुसार लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांची वारस हक्क नेमणूक केली जाणार आहे. मात्र, यामध्ये खुल्या व ओबीसी प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मांडली आहे.

संजोग वाघेरे पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या अध्यादेशानुसार लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांची वारस हक्क नेमणूक करण्याचा निर्णय झाला आहे.

याची अंमलबजावणी करत असताना आतापर्यंत ज्या वारस हक्काने राजीनामा दिला आहे. तसेच, राजीनामा देऊ इच्छिणाऱ्या सर्व चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांनी आपल्या वारसाच्या नेमणुकीबाबत शिफारस केलेली आहे. या लोकांच्या बाबतीत योग्य निर्णय सहानुभूतीपूर्वक करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचा-यांसाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. अनेक कुटुंबांचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. यापूर्वी असंख्य कर्मचा-यांची नेमणूक या वारस हक्काप्रमाणे झालेली आहे. सद्यस्थितीत शिफारस केलेल्या कर्मचा-यांचा वारसांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यांना प्रशासनाने नेमणूक करून न्याय द्यावा, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.