Pimpri news: शहरातील नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरु होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारी 2021 पासून प्रत्यक्षात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत  सर्व आस्थापना टप्या-टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार  23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन केले होते. परंतु, दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होत होती.  पिंपरी शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आणि शिक्षकांच्या कोरोनाच्या चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने पिंपरी महापालिकेने 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पुन्हा त्यामध्ये वाढ करत 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा 3 जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयात वाढ केली होती. आता शाळा बंद ठेवण्याचा आदेश मागे घेत महापालिका हद्दीतील नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना!
#शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
#शाळेत स्वच्छता व निर्जुंतीकरण विषय सुविधा सुनिश्चित करणे
#हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे
#थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी
#शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे.
# शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची कोविडची आरटीपीसीआर चाचणी  बंधनकारक असेल. चाचणीचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवण्यात यावे.
#वर्गखोली, स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी.
#शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कचा वापराबाबत मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर प्रदर्शित करावेत.
# विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी.

#शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते का, याबाबतची शाळेच्या मुख्याध्यपकांनी खात्री करुन घेणे आवश्यक राहील.

#विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहण्यात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निर्जुंतीकरण केले जाते का, याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी.

4 जानेवारीपासून 4490 विद्यार्थी जाणार शाळेत

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नववी ते बारावीपर्यंतच्या पालिका, खासगी अशा 282 शाळा आहेत. त्यात पालिकेच्या नववी ते दहावीच्या 18 आणि 6 उर्दु अशा 24 शाळा असून 4490 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 229 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.