Chinchwad : स्वच्छ पवनामाई अभियानात शुक्रवारी पवनामाईची महाआरती

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी मुक्त व जलपर्णीविरहित स्वच्छ, सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वास शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पवनामाईची महाआरती केली जाणार आहे.

मोरया गोसावी मंदिराशेजारी,  जिजाऊ पर्यटन केंद्र येथे शहराची जीवनदायिनी असलेल्या पवनामाईची उद्या सायंकाळी सहा वाजता महाआरती होणार आहे. पवनामाई अभियानांतर्गत गेली दोन वर्षे अविरत पिंपरी-चिंचवडमधील नदीच्या प्रदूषण आणि संवर्धनावर काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या 100 सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित राहतील. नदी स्वच्छतेसाठी रोटरीला सीएसआर फंडातून निधी देणारे मेसर्स एक्साइड बॅटरीज उद्योग समूह, मेसर्स सद्गुरू इंटरप्रायजेस हिंजवडी,  चंद्रकांत दामोदर कुलकर्णी तसेच इतर नदींप्रेमीनी पवनामाईची महाआरती करण्याचे नियोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवनदायिनी पवना नदीबद्दल नागरिकांमध्ये आत्मीयता वाढावी, प्रेम वाढावे, तसेच आपल्या कृतीतून नागरिकांनी नदीमध्ये कचरा अथवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक, सांडपाणी टाकू नये अथवा सोडू नये यासाठी इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला वेगवेगळ्या घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी इतर संस्थांच्या माध्यमातून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे क्लबचे अध्यक्ष सोमनाथ हरपुडे यांनी सांगितले. जास्तीत-जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.