Sangavi: सांगवीतील नाल्यांसह पवना, मुळा नदीची सफाई करा – प्रशांत शितोळे

Clean the river Pavana, Mula along with the streams in Sangvi - Prashant Shitole

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील नाले,  पवना तसेच मुळा नदीतील साफसफाई करण्यात यावी. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या स्टॉर्म वॉटर लाईन, सर्व ड्रेनेज लाईन, नदीतील हाइसिंथ पाला, नदीकडेने असलेले सर्व छोटे-मोठे नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, सांगवी भागातून पवना व मुळा नदी वाहत असून या दोन्ही  नद्यांमध्ये  हाइसिंथमुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येत आहे. अगोदरच  कोरोनासारख्या रोगाची भीती नागरिकांमध्ये असताना नदीतील पाला पाहून नागरिक इतर रोग होईल की काय? यामुळे भेदरलेल्या अवस्थेत आहेत.

सांगवी परिसर पवना व मुळा या दोन नद्यांच्या संगमावर असल्याने कायमच पुराच्या धोक्यामध्ये असतो. त्यामुळे आपण केलेला दौरा नागरिकांना सुरक्षितता होईल या दृष्टीने उपयुक्त झाला पाहिजे.

त्यासाठी सर्व नाले तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला असलेल्या स्टॉर्म वॉटर लाईन, सर्व ड्रेनेज लाईन, नदीतील हाइसिंथ पाला, नदीकडेने असलेले सर्व छोटे-मोठे नाले, रस्त्यावरील न वाहणारे पाणी इत्यादी समस्यांची विल्हेवाट लावली पाहिजे.

शहरातील किंवा संबंधित परिसरातील रस्त्यांची कोणतेही परिस्थितीत खोदाई करू नये. केवळ वाहत्या पाण्याला नदीच्या दिशेने वाट करून देण्यासाठी व्यवस्था करावी. पावसाळ्यामध्ये रस्ते खोदाईस बंदी असते. त्याचप्रमाणेच काम व्हावे व सध्या रस्तेखोदाई असलेली कामे डागडुजी करून तातडीने थांबवावी.

स्टॉर्म वॉटर लाईन स्वच्छता करावी. बंद नाले, ओपन नाले, गटारे साफसफाई करावी. पाणी साचणारी ठिकाणे पाहून पाणी वाहून जाईल, अशी तात्पुरती व्यवस्था व्हावी.

पूर परिस्थिती उद्भवेल असा अंदाज मानून पवना व मुळशी धरणातील पाण्याचे नियोजन व्हावे. पावसाळ्यात नळांना गढूळ पाणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

नागरिकांचे आरोग्य आणखीन धोक्यात येऊ नये यासाठीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. दौरा केवळ फार्स ठरू नये. तर तो नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरावा, अशी अपेक्षा शितोळे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.