Pimpri News : कामाचे स्वरूप, जबाबदारीची माहिती दिल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा – जितेंद्र वाघ  

 एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षणाच्या नियोजनाची अंतिम अंमलबजावणी सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत होत असते. कामाचे स्वरूप व जबाबदारीची माहिती करून दिल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होत असते. स्वच्छतामित्र म्हणून भूमिका बजावत असताना ते अधिक प्रभावीपणे (Pimpri News) करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असून त्यासोबत सफाई कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना योजनांची संपूर्ण माहिती व त्यांची नोंदणी या प्रशिक्षणादरम्यान करून घेतली जात आहे असा दुहेरी उद्देश या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साध्य होत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने  महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत 4 ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात क आणि ग क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचा-यांचे  प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, शीतल वाकडे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, कॅम फाउंडेशनचे प्रणव टोम्पे, डिव्हाईन या माध्यम संस्थेचे प्रतिनिधी  तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सफाई कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक घरात कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा महापालिकेचा मानस आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कर्मचा-यांचे योगदान मोलाचे आहे.(Pimpri News) त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत आहेत.  हे काम सातत्याने करत राहिल्यामुळे त्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Pimpri News : भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचलं पाहिजे आणि सर्वानी ते आत्मसात करायला हवं – धम्मराज साळवे

कामाएवढेच स्वतःचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून त्याबाबतची  योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचा-यांना आणि त्यांच्या पाल्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरु आहे. त्यास सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमात क  आणि ग  कार्यालयांच्या अधिनस्त असलेल्या ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या सफाई कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार (Pimpri News) यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रियांका कापोरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगारभिमुख शिक्षण आणि कोर्सेसबद्दल माहिती यावेळी सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले तर सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.