Pimpri: शहरवासियांना दिवाळी भेट; शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु – एकनाथ पवार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना सत्ताधारी भाजपने दिवाळी भेट दिली आहे. एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. 600 चौरस फुट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी तर 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या पुढील 18 हजार मिळकतीचा 74 कोटी असा एकूण 150 कोटी शास्तीकर माफ होणार आहे. नागरिकांनी चालू वर्षाचा मिळकत कर भरुन शास्तीकर माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले.

राज्य सरकारने शास्तीकर माफीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 600 चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामांना पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ करण्यात आला आहे. तर, 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामांना 50 टक्के शास्तीकर आकारण्यात येणार आहे. तर, 1 हजार 1 चौरस फुटांपुढील निवासी व सर्व प्रकारच्या बिगरनिवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्तीकर असणार आहे. तथापि, निर्णय होऊनही प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी सुरु झाली नव्हती. सत्ताधा-यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन अंमलबाजवणीस सुरुवात केली आहे.

एकनाथ पवार म्हणाले, भाजपने शहरवासियांना शास्तीकर माफीचा शब्द दिला होता. तो शब्द पाळला असून पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीमध्ये बदल केले आहेत. नागरिकांना शास्तीकर सवलतीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शहरात 600 चौरस फुटांपर्यंच्या 30  हजार 94 मिळकती आहेत. त्यांचा 80 कोटी शास्तीकर माफ होणार असून  यापुढे या बांधकामांना शास्तीकर लागू नाही.  तर, 601 ते 1 हजार चौरस फुटांपर्यंतची 18 हजार 150 निवासी बांधकामे आहेत.

त्यांचा 74 कोटी शास्तीकर माफ होणार आहे. एकूण 150 कोटी शास्तीकर माफ केला जाणार आहे. तसेच यापुढे 601 ते 1 हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकांनाना 50 टक्के शास्तीकर असणार आहे. नागरिकांनी चालू वर्षाचा मिळकत कर भरुन शास्तीकर माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.