Lohgad: ‘ट्रेकिंग पलटण’च्या वतीने दिवाळीच्या पहाटे विसापूर गडावर स्वच्छता मोहीम!

एमपीसी न्यूज-  सर्वजण आपापल्या परीने दिवाळी पहाट साजरी करीत असताना ‘ट्रेकिंग पलटण ग्रुप, पुणे’च्या सदस्यांनी विसापूर गडावर स्वच्छता करून दिवाळी पहाट साजरी केली.

ट्रेकिंग पलटणीचे सदस्य भल्या पहाटे विसापूर गडावर पोहोचले, तेव्हा सर्वत्र दाट धुके होते. थोड्या वेळाने धुके कमी झाल्यावर पलटणने गडाच्या विस्तीर्ण पठारावर स्वच्छता सुरू केली. गडावर भटकंतीला, मुक्कामी येणारे पर्यटक, ट्रेकर यांनी टाकून दिलेला कचरा उचलण्यात आला. विशेषतः गडाच्या चढण्याच्या धबधब्यांच्या मार्गावर आजूबाजूच्या झाडाझुडुपांमध्ये खूप बाटल्या फेकलेल्या आढळल्या, पलटणीने सावधपणे हा प्लास्टिक कचरा जमा केला.

 बऱ्याच पाण्याच्या बाटल्यांना मद्याची दुर्गंधी येत होती. यावरून गडावर मद्यपी पर्यटकही येत असल्याचे लक्षात येते. विसापूरच्या मानाने शेजारच्या लोहगडावर जास्त पर्यटक येतात. विसापूरवर त्यामानाने कमी गर्दी असते. म्हणूनही बहुधा मद्यपी पर्यटक गैरफायदा घेत असावेत. शिवाय मांसाहाराच्याही खाणाखुणा दिसल्या. ट्रेकिंग पलटणीने पर्यावरणास घातक कचरा गडाच्या पायथ्याशी आणला.
ट्रेकिंग पलटणच्या या अनोख्या दिवाळी पहाट स्वच्छता मोहिमेत डॉ. सुरेश इसावे, डॉ. मिलिंद गायकवाड, संदीप चौधरी, श्रीरंग गोरसे आणि कुमार खुंटे यांनी सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेचे नियोजन डॉ सुरेश इसावे  यांनी केले. डॉ. संदीप गाडेकर यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.