Pimpri : परिवहन कार्यालयातील कोरोना काळातील स्लॉट बुकिंग पद्धत बंद करा

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सामाजिक अंतर पाळून सुरक्षित काम करता यावे यासाठी परिवहन विभागाकडून आरटीओ कार्यालयातील विविध कामांसाठी स्लॉट बुकिंग पद्धत सुरू करण्यात आली. ही पद्धत आता बंद करून पूर्वीप्रमाणे कामकाज सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनकडून परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालवण्याचा परवाना आणि आरटीओ कार्यालयातील सर्व सेवांसाठी स्लॉट बुक करून त्यानुसार कामकाज केले जात होते. कोरोनाच्या काळात याची आवश्यकता होतीच.

सध्या परवाना नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स, पत्ता बदलणे, नाव बदलणे, रिक्षा बॅच, टॅक्सी बॅच, बस बॅच यांसारख्या कामांसाठी स्लॉट बुकिंगद्वारे जानेवारी 2021 पर्यंतची तारीख मिळत आहे. खाजगी वाहन नावावर करणे, गाडीवर बँकेचा बोजा चढविणे, गाडीवरील बोजा उतरविणे व अन्य सेवांसाठी स्लॉट बुक करणे अनिवार्य आहे. यामुळे नागरिकांना अनेक दिवस ताटकळत राहावे लागत आहे.

त्यामुळे स्लॉट बुकिंगची सक्ती रद्द करून आरटीओ मधील कामकाज लॉकडाऊन पूर्वी प्रमाणे सुरू करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.