CM Address To State : नवीन वर्षाचं स्वागत करताना दक्षता बाळगा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ती घेतली तरी मास्क लावणं हे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जवळपास एक महिन्यांनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसह इतर गोष्टींवर भाष्य केलं.

पुढचे सहा महिने मास्क घालने बंधनकारक
लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील.

आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, कोरोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहेच.

अनेकजण डोळे लावून बसले होते, पण..
गेल्या 28 नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल, मग पडेल, उद्या पडेल, आता पडलंच. हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही
अनेकांनी मला सांगितलं की, ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरुवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरुन येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.