CM Letter to Citizens : मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला पत्र, नववर्षाच्या शुभेच्छा देत केलं ‘ हे’ आवाहन

एमपीसी न्यूज- नववर्षाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. कोरोना काळ आणि येणाऱ्या भविष्यात आपलं वर्तन कसं असावं, याविषयी त्यांनी या पत्रात मार्गदर्शन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी या पत्रात केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले आहे पत्रात ?
गेले वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने कोरोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना संकट काहीशा प्रमाणात कमी करत आणले असले तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे.
एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहोत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. pic.twitter.com/s8xNQvvmFL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2020
पुढील काळ कसा असेल, याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.
आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.
विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत.
शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मित संकटे नेहमीच येतात. परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात.