CM On Upsc Result: यशस्वींचा अभिमान, ते संधीचे सोने करतील – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar Congratulate to the students who have passed the UPSC exam या संधीचे तुम्ही निश्चित सोने कराल, असा विश्वास वाटतो.

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वींनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून ते या संधीचेही सोने करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणाले, आपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टाने स्वप्नाला गवसणी घातलीच आहे. आता तुम्ही आपला समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, त्याचाही अभिमान आहे.

या संधीचे तुम्ही निश्चित सोने कराल, असा विश्वास वाटतो. या वाटचालीत तुमच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या आई-वडील, पालक यांच्यासह गुरूजन, मार्गदर्शकांचेही अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

जनतेचे कल्याण आणि व्यापक देशहित लक्षात घेऊनच आपण निर्णय घ्याल – उपमुख्यमंत्री

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेले यश हे तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना यापुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कल्याण आणि व्यापक देशहित लक्षात घेऊनच आपण निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या गुरुजनांचे, पालकांचे, मार्गदर्शकांचे, मित्रांचे, हितचिंतकांचेही मी या निमित्ताने अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.