Dussehra 2021 : … मग यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? – शिवसेना पक्षप्रमुखांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून झाला असा जर कोणी गळा काढत असतील, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का, अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.15) केली. यंदाच्या वर्षी देखील कोरोनाचे संकट असल्याने अगदी साधेपणाने, काही मोजक्या, महत्त्वाच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे जोरदार भाषण केले आणि विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

दरवर्षी शिवतीर्थावर हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. अगदी कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचा हा जनसागर ओसांडून वाहतो. मात्र यंदा देखील कोरोनाचे संकट लक्षात घेता शिवसेनेने कमी लोकांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पाडला. मुंबईतील षणमुखानंद हाॅल मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात कमी लोकांच्या उपस्थितीत हा मेळावा होत असला तरी आपला आवाज कोणी दाबू शकत नाही. आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय, असा मिश्किल टोला लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात केली आणि भाषणाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनाप्रमुखांनी गर्जना करत भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

भाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्य, शिवसैनिकांची कार्याप्रती तप्तरता यांचे अनेक दाखले देत राज्यातील जनता आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. दरम्यान, ‘मी आजही सांगतो, हिंमत असेल तर सरकार पाडुन दाखवा’ असे म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान सुद्धा दिले.

भाजपला धारेवर धरताना त्यांनी फडणवीसांना लक्ष करत म्हणाले, मी पुन्हा येणार म्हणणारे आता म्हणतायेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा तिथेच, असा टोला लगावूून मला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये? असे ठाकरे पुढे म्हणाले.

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून झाला असे जर गळे काढत असतील तर, यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? पण महाराष्ट्र शिवरायांचे आहे त्यामुळे कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे म्हणत साकीनाका प्रकरणावर ठाकरे यांनी निषेध दर्शवत आरोपीला फासावर लटकल्याशिवाय राहणार नाही, असे वचन या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिले.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.