CM Uddhav Thackeray : ‘MAH कसम’ आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद असून याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.