Mumbai: तुम्ही घराबाहेर गेलात तर शत्रू तुमच्या घरात येईल, एसी बंद करा, खिडक्या उघडा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे. तुम्ही घराबाहेर गेलात तर शत्रू तुमच्या घरात येईल. त्यामुळे  घराबाहेर पाऊल टाकू नका, या संकटाशी सामना करायचा असेल तर घरातच राहा असे आवाहन करत एसी बंद करा आणि  खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. घरात मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. गुढीपाडवा आज आपल्याला जल्लोषात साजरा करता आला नाही. हरकत नाही. आपण गुढी पाडवा जरूर साजरा करू. या संकटावर मात करून करून आपण विजयाची गुढी उभारू असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना म्हणजे हे जागतिक युद्ध आहे. या युद्धाची सर्वांना चांगलीच कल्पना आली आहे. नागरिक घराबाहेर पडत नाहीत ही समाधानाची बाब आहे.  अनेक घरांमध्ये कुटुंबीय एकत्र आले असून ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.

काल रात्री काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही. त्यामुळे दुपारी आलो असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही. बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जावू नये. सुचनांचे पालन करावे. हातावर पोट असलेल्यांचं किमान वेतन थांबवू नये असे आवाहन उद्योजक, कंपनी व मालकवर्गाला केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.