Pune : रिटेल व्यापाऱ्यांसाठी सहकारी सोसायटीची स्थापना होणार

रिटेल व्यापारी व ग्राहकांच्या फायद्यासाठी मालाची खरेदी एकत्रित करणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने रिटेल सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिटेल व्यापारातील परकीय गुंतवणूक आणि मॉलबरोबरील स्पर्धेत रिटेल व्यावसायिक टिकावा यासाठी ही सहकारी सोसायटी काम करणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

देशात 7 कोटी रिटेल व्यापारी आहेत. या व्यावसायिकांना रस्त्यावर आणण्याचे धोरण सध्याच्या केंद्र सरकारने घेतले आहे. रिटेल व्यापारात शंभर टक्के परकीय गुंतवणूक येणार असल्याने मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये उतरत आहेत. सुरुवातीच्या काळात तोट्यामध्ये धंदा करून पुन्हा मक्तेदारी निर्माण करण्याचे काम या मोठ्या कंपन्या करतात. जगभरात हाच अनुभव आलेला असताना भारत सरकार याच कंपन्यांसाठी सोयीचे निर्णय घेत आहे. आधीच मॉलच्या स्पर्धेत रिटेल व्यापारी अडचणीत सापडलेला असताना परकीय गुंतवणुकीचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे रिटेल व्यापाऱ्याने एकत्र आले पाहिजे, एकत्रित खरेदी करून जास्तीत जास्त फायदा ग्राहकाला कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. रिटेल सहकारी सोसायटी रिटेल व्यापाऱ्यांच्या भल्यासाठीच काम करेल, असेही निवंगुणे म्हणाले. यावेळी उमेश यादव उपस्थित होते.

रिटेल सहकारी सोसायटीच्या माध्यमातून रिटेल व्यापाऱ्यांना सभासद केले जाईल. सभासद असलेले रिटेल व्यापाऱ्यांची मागणी व त्यांच्याकडील विक्रीचा ताळेबंद करून मालाची एकत्रित खरेदी केली जाईल. एकत्रित खरेदी केल्याने कमी किंमतीत माल व वस्तू मिळतील. आणि या वस्तू ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत कमी किंमतीत विकता येतील. यातून मॉल व ऑनलाइन व्यावसायिकांच्या स्पर्धेत रिटेल व्यापारी टिकू शकतो. तेच काम ही रिटेल सहकारी सोसायटी करणार आहे. यासंदर्भातील सर्व काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही रिटेल सहकारी सोसायटी अस्तित्वात येईल. रिटेल व्यापाऱ्यांनी यासंदर्भात रिटेल व्यापारी संघाला संपर्क साधावा, असेही निवंगुणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.