Colleges Reopen : राज्यातली महाविद्यालये ‘या’ तारखेपासून सुरू होणार ; उदय सामंत यांची माहिती

एमपीसी न्यूज – राज्यातली महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

उदय सामंत म्हणाले, ‘महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठरवलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’

‘ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वसतिगृहेसुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.’

दरम्यान, पुण्यातील महाविद्यालये मंगळवारपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, शासन निर्णय आणि महाविद्यालयाची नियमावली जाहीर झाली नसल्याने पुण्यातील बहुतांश महाविद्यालये सुरू झाली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.