Pimpri : पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये प्राधिकरणाच्या भूखंडावर होण्याचा मार्ग मोकळा 

प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक नऊ येथील पाच भूखंड शैक्षणिक संस्थाना देणार;आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश  

एमपीसी न्यूज – पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची महाविद्यालये पिंपरी-चिंचवड शहरात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या संचालकांनी शैक्षणिक संस्थासाठी प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक नऊ येथे पाच भूखंड विकास आराखड्यामध्ये मंजूर केले आहेत. त्यानुसार शैक्षणिक प्रयोजनाकरिता भूखंड वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन निविदेमार्फत केली जाणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाविद्यालये झाल्यास शहरातील विद्यार्थ्यांना शहरातच चांगले शिक्षण मिळेल, त्यांच्या प्रवासातील अमूल्य वेळेची बचत होईल, असे आमदार लांडगे म्हणाले.  

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक लाख विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांचा प्रवासात वेळ वाया जातो. तसेच पुण्यातील वाहतूकोंडीत देखील भर पडते. त्यासाठी पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थानी पिंपरी-चिंचवडमध्ये महाविद्यालये सुरु करावीत. त्याकरिता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांना नाममात्र दरात जागा द्यावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी  5 जुलै 2019 रोजी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि मुख्याधिका-यांना दिले होते.

आमदार लांडगे यांच्या मागणीची दखल घेऊन 25 जुलै 2019 रोजी पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच प्राधिकरणाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक  झाली. त्यामध्ये प्राधिकरणाकडे 12 शैक्षणिक भूखंड वाटपासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी पाच भूखंड 1 हेक्टरच्यावर असून त्याचा वापर शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी करता येईल. मोशीत प्राधिकरणात प्राधिकरणामार्फत 1400 घरे बांधण्याचे कामकाज प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या परिसरात शाळा, महाविद्यालयांची आवश्यकता भासणार असल्याची चर्चा बैठकीत झाली.

त्यानुसार राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या संचालकांनी प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक नऊ येथे 5 भूखंड विकास आराखड्यामध्ये शैक्षणिक संकुलासाठी मंजूर केले आहेत. या भूखंडाचे वाटप ऑनलाईन निविदेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची निविदा तत्काळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांनी या प्रक्रियेत भाग घेऊन भूखंड ताब्यात घेऊन शैक्षणिक संकुल उभारण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “शहरातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी पुण्यात जातात. प्रवासात विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया जातो. शहरात नामांकित शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयांना जागा देण्यास मान्यता मिळाली आहे. शहरात महाविद्यालये झाल्यास विद्यार्थ्यांना शहरातच चांगले शिक्षण मिळणार आहे. त्यांच्या प्रवासातील वेळेची बचत होईल. पुण्यातील गर्दी देखील कमी होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होईल”  आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून चिखलीत गायरान जागेवर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम सुरु

यापूर्वी आमदार महेश लांडगे यांनी शासकीय गायरान जागा पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी हस्तांतर करून दिलेली आहे. त्यानुसार चिखली येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आता त्याच धर्तीवर प्राधिकरणाच्या भूखंडावर पुण्यातील  नामांकित महाविद्यालयांना पेठ क्रमांक नऊ येथे पाच भूखंड एक हेक्टरच्या वरती क्षेत्रफळ असलेले दिले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांनी या प्रक्रियेत भाग घ्यावा. भूखंड ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक संकुल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.