Talegaon dabhade: राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून मिळकतकरवाढ रद्द होण्यासाठी एकत्र यावे – सुनील शेळके

एमपीसी  न्यूज-राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहरातील सर्व राजकीय पक्षांनी व नेत्यांनी जनहितासाठी एकत्र यावे व मिळकत करवाढ रद्द होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक सुनील शेळके यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरातील सर्व नागरिकांना चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली असून मोठ्या प्रमाणात वाढीव कर आकारणी झाली आहे. या लादलेल्या जिझिया कराच्या विरोधात आपण तळेगाव शहरात जनजागृती करून 30 नोव्हेंबर पर्यंत हरकती नोंदविण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये सुमारे 11 हजार मिळकतधारकांनी हरकती नोंदवल्या. त्यातील आलेल्या हरकतींवर प्रशासनाने सुनावणी देखील घेतली, हे सर्व होत असताना काही राजकीय मंडळी राजकारण करू पाहत आहेत, हे दुर्दैवी आहे, असे शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सर्व राजकीय पक्षांचे पदधिकारी व नगरसेवकांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन व स्टंटबाजी बंद करून प्रशासनाच्या विरोधात व नागरिकांच्या हितासाठी एकत्रित यावे, आम्ही केलेल्या कामचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनहितासाठी एकत्र येणे जास्त गरजेचे आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.मिळकत करवाढ कायद्याच्या चौकटीत कमी झाली पाहिजे आणि ती होणारही आहे. त्यावेळी आम्ही मोठ्या मनाने त्याचे श्रेय सर्वांना देऊ पण त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने पाठपुरावा करावा, असे कळकळीचे आवाहन शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.