Comedian Bharti & Harsh News : कॉमेडिक्वीन भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांना जामीन

एमपीसी न्यूज – कॉमेडिक्वीन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. घरात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी दोघांना ‘एनसीबी’ने अटक केली होती.

दोघांनी कालच कोर्टापुढे जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. पण यावर उत्तर देण्यासाठी एक दिवसाचा अवधी तपास यंत्रणांना  देण्यात आला होता.

परंतु, सरकारी वकील काही कारणांमुळे कोर्टात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे अखेर कोर्टाने या दोघांची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करुन त्यांना एनसीबीला यापुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतलं. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर हर्ष लिम्बाचिया यालाही अटक करण्यात आली.

काल दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया या दोघांनाही कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला होता.

आज दोघांच्याही जामीन अर्जावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, एनसीबीने शुक्रवारी ( दि. 20) एका ड्रग तस्कराला पकडलं. त्याने दिलेल्या माहितीनंतर भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. मग चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.