MavalNews : गोवित्री येथील कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामास सुरवात

सव्वादोन कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज : नाणे मावळातील गोवित्री येथील कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामास मंगळवारी (दि. 7) भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली. या पुलाच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुमारे 2 कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या पुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी माजी सभापती गणपतराव शेडगे, कैलास गायकवाड, देविदास गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड,विजय गायकवाड, नारायण मालपोटे, भाऊसाहेब मोरमारे, भाऊसाहेब दाभणे, रामभाऊ इंगवले, तुकाराम शिंदे,दिलीप बगाड,रघुनाथ भूरूक, ज्ञानोबा पवार, भाऊसाहेब सुतार,नथू आढाव,मधुकर जाधव,किसन जाधव, मनोज पोळ,अमोल कोंडे, अमोल पवार, नितीन शेलार, प्रवीण शेडगे, किरण गायकवाड,सदाशिव केदारी,अशोक काजळे आदि. मान्यवर उपस्थित होते.

गोवित्री येथील कुंडलिका नदीवरील हा पुल नाणे ते जांभवली या रस्त्यावरील महत्वाचा पूल असून या ठिकाणी पूर्वी असलेला पूल अरुंद असल्याने या पुलावरून एकावेळी दोन वाहने जाऊ शकत नव्हती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच अनेकवेळा अपघात देखील होत होते. कुंडलिका नदीवरील हा पूल वडिवळे धरणा खालील पहिलाच पूल असल्याने पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडल्यास हा पूल पाण्याखाली जात होता.

पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत होता. यामुळे याठिकाणी नवीन उंच व रुंद पूल उभारण्याची नागरिकांनी मागणी केली होती. आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या कामासाठी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

गोवित्री येथील कुंडलिका नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाची उंची पूर्वीच्या पुलापेक्षा एक मीटर ने जास्त म्हणजेच 3.5 मीटर असणार आहे, लांबी 60 मीटर व रुंदी 8 मीटर इतकी असणार आहे. या पुलाच्या कामासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.