Maval News : नवीन उकसान येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास शुभारंभ  

आमदार सुनिल शेळके यांनी उपलब्ध करून दिला 89 लाख 31 हजार निधी

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदीवरील नाणे मावळ येथील नवीन उकसान जवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. शेती व पाणीपुरवठा या दोन प्रमुख गोष्टीसाठी या बंधाऱ्याचा वापर होत होता.

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सुमारे 89 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून मंगळवारी (दि.9) रोजी या ठिकाणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

इंद्रायणी नदीवरील उपनदी असलेल्या कुंडलिका नदीवर वडिवळे धरण बांधण्यात आले असून या धरणातून नियमितपणे पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व बारमाही शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. या नदीवर पाणी अडवून ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत.

परंतु नवीन उकसान येथील बंधारा अतिशय जीर्ण झाला आहे. याठिकाणी पाणी अडवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने पाणी या ठिकाणी साठत नव्हते. त्यामुळे लगतच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. आमदार शेळके यांनी या ठिकाणी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच या पुलाचे काम लवकर व उत्तम पद्धतीने व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप आंद्रे, समीर आंद्रे, चारुशीला म्हाळसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आंद्रे, अमोल कोंडे, सोमनाथ बिनगुडे, सुधीर आंद्रे, शरद वाघुले, अमोल पवार नितीन शेलार, अंकुश बिनगुडे ,आकाश शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.