Chinchwad News : क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील कामाला प्रारंभ

एमपीसी न्यूज – चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर बंधुच्या स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये बहुउद्देशीय सभागृह प्रदर्शनाकरिता हॉल, ऐतिहासिक वस्तुच्या संग्रहालयाकरिता हॉल, कॉन्फरन्स रूम, जिमनॅशिअम हॉल आदी बाबींचा समावेश आहे. या कामासाठी 5 कोटी 75 लाख रूपये खर्च अपेक्षित असून ही रक्कम क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीकडे सोपविण्यात येणार आहे. एकूण रकमेपैकी 15 टक्के रक्कम म्हणजेच 86 लाख रूपये क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीकडे आगाऊ स्वरुपात दिली आहे.

चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तु आहे. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतीवीर चापेकर यांची पुरातन वास्तु नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून 12 जून 1997 रोजी क्रांतीवीर चापेकर बंधुचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिकेला आदेश देण्यात आले. त्यानुसार, सन 1997 मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्या अंतर्गत मायक्रोपाईल पद्धतीने फाऊंडेशन करण्यात आले. दुस-या टप्प्याचे काम सन 2001 मध्ये करण्यात आले. त्यामध्ये स्मारकाच्या मुख्य दरवाजाकडील दर्शनिय भागाचे काम करण्यात आले. स्मारकाचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी तिस-या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

तिस-या टप्प्याच्या कामामध्ये बहुउद्देशीय सभागृह प्रदर्शनाकरिता हॉल, ऐतिहासिक वस्तुच्या संग्रहालयाकरिता हॉल, कॉन्फरन्स रूम, जिम्नॅशिअम हॉल आदी बाबींचा समावेश आहे. तिस-या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2016 रोजी बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे. या कामात तळमजला अधिक चार मजले असे स्मारक इमारतीचे बांधकाम असून या इमारतीतील काही कामे प्रचलीत ऐतिहासिक पारंपारीक स्वरूपाची आहेत. तिस-या टप्प्यातील काम दोन भागात करण्यात येणार आहे. त्यासाठी क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपपरी – चिंचवड महापालिका यांच्यात 30 डिसेंबर 2017 रोजी करारनामा करण्यात आला आहे. पहिल्या भागात इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी 48 लाख 96 हजार रूपये इतक्या रकमेची निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार या कामाचे आदेश यशक असोसिएटस यांना 6 ऑगस्ट 2018  रोजी देण्यात आले. या कामाची मुदत 5 ऑगस्ट 2019 पर्यंत होती.

या कामामध्ये प्रस्तावित कामातील 214.88 चौरसमीटर क्षेत्रफळाचे काम करण्यात आले. करारनाम्यात विकसित करायच्या मालमत्तेचे क्षेत्रफळ 3 हजार 900 चौरस फुट इकते होते. तथापि, विकसित करायच्या क्षेत्रात 432.28  चौरस मीटर वाढ होऊन एकूण क्षेत्रफळ 729.76 चौरस फुट इतके होते. क्षेत्रफळात वाढ झाल्याने सुधारीत बांधकाम परवानगी घेण्यात आली. त्यानुसार, विकसित करायचे एकूण क्षेत्रफळ 1703.9 चौरस मीटर इतके येत आहे. सुधारीत बांधकाम परवानगीनुसार 1184 चौरस मीटर इतकी वाढ होत आहे. प्रस्तावित सुधारीत बांधकाम परवानगी घेण्याची कार्यवाही बांधकाम परवाना विभागाकडून सुरू आहे. क्षेत्रफळानुसार मुळ कामाच्या स्वरूपात बदल झाल्याने कामाच्या व्याप्तीत वाढ होत आहे.

तिस-या टप्प्यातील कामासाठी वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून किमया आर्कीटेक्ट यांची सन 2017 मध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तिस-या टप्प्यातील दुस-या भागातील करायच्या सर्व कामासह पहिल्या भागामध्ये होऊ न शकलेल्या कामांचा समावेश करणे प्रस्तावित आहे. यामध्ये आरसीसी बांधकाम, वीट बांधकाम, प्लास्टर, प्लंबिंग विषयक कामांसाठी अंदाजपत्रक तयार केले आहे.

या कामासाठी सन 2017-18 च्या अंदाजपत्रकात कामाच्या तिस-या टप्प्यातील भाग एक, दोन आणि तीनच्या कामासाठी एकत्रित 12 कोटी रूपये एवढी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय मान्यतेतून भाग एक करिता 58 लाख 50 हजार रूपये, भाग दोन करिता 4 कोटी 47 लाख 67 हजार रूपये आणि भाग तीनकरिता 6 कोटी 93 लाख 57 हजार रूपये असे एकूण 11 कोटी 99 लाख 75 हजार रूपये इतकी अंदाजपत्रकीय रक्कम येत आहे.

या कामासाठी सन 2020-21 च्या अंदाजपत्रकात 3 कोटी 90 लाख रूपये इतकी तरतुद उपलब्ध आहे. या तरतुदीतून भाग दोन व तीनसाठी 11 कोटी 41 लाख रूपये रकमेचे काम चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित आहे. या वर्षासाठी असलेली 3 कोटी 90 लाख रूपये तरतुद या कामासाठी आहे.

टप्पा तीनच्या विकासाकरीता 6 कोटी 93 लाख रूपयांचा खर्च!

क्रांतीवीर चापेकर स्मारक इमारतीचे उर्वरीत काम करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2020 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, तिस-या टप्प्यातील कामासाठी क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात करारनामा करणे आवश्यक आहे. करारनाम्यातील तरतुदीनुसार या कामावर होणा-या भाग तीनकरिता 6 कोटी 93 लाख रूपये इतकी खर्चाची रक्कम येत आहे. ही निविदा रक्कम क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीकडे द्यायची आहे. समितीने यासाठी निविदा काढायची आहे. तसेच ही रक्कम निविदेप्रमाणे कामाच्या प्रगतीनुसार द्यायची आहे. निविदा रक्कम 5 कोटी 75 लाख रूपये रकमेच्या 15  टक्के म्हणजेच 86 लाख 34 हजार रूपये बँक गँरटीपोटी चापेकर स्मारक समितीला आगाऊ देण्यात येणार आहे.

ऐतिहासिक काळास साजेशी अंतर्गत सजावट!

स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील दुस-या भागात करायच्या कामामध्ये ऐतिहासिक पुरातनकाळास साजेशी अंतर्गत सजावटीची विविध कामे आणि पहिल्या भागात राहिलेले आरसीसीचे काम प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याकाळात वापरण्यात येणा-या वस्तु, भांडी, वेषभुषा अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, तात्कालीन व्यक्तींचे पुतळे, पुरातन काळातील प्रसंगाचे म्युरल्स, गडकोट, किल्ले यांच्या प्रतिकृती, पुरातन भिंतीचित्रे आदी कामांचा समावेश आहे. अशा प्रकारची कामे महापालिकेच्या देखरेखीखाली करणे शक्य नसल्याने चापेकर स्मारकाच्या तज्ञ समितीच्या देखरेखीखाली ही कामे करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.