Pimpri News: आमदार महेशदादांच्या वाढदिवसाचे फुटपाथ, रस्त्यावरील फलक काढा; आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त फुटपाथ, रस्त्यावर लागलेले फलक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. उद्या वाढदिवस असताना आज फलक काढण्याचा आयुक्तांनी आदेश दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता असताना प्रशासन फलक काढण्याचे धाडस करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. निवडणुकीच्या अगोदरचे वर्ष आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा उद्या (शनिवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त समर्थकांनी फलकबाजी करत जोरदार वातावरणनिर्मिती केली. इच्छुकांनी फलक लावून दादांवरील प्रेम व्यक्त केले आहे.

फलक परवानगी घेऊन लावले आहेत. तर, काही परवाननी न घेताही लावले आहेत. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी फलक लावले आहेत. उद्या वाढदिवस असताना आज अचानक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट अधिका-यांना फलक काढण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर आणि पोस्टर्सचा पूर आला आहे. संपूर्ण शहरात बॅनर आणि पोस्टर लावू शकत नाही. नियम सर्वांसाठी समान असला पाहिजे. मोठमोठे होर्डिंग्ज सोडून रस्त्यावर आणि फूटपाथवर असलेले बॅनर आणि पोस्टर्स काढून टाकावेत.

अगोदर फलक लावणा-याला फलक काढून टाकण्यास सांगावे. जर, त्यांनी पुढील सहा तासांत फलक काढले नाही. तर, कृपया महापालिकेने ते काढून टाकावेत. काढताना बॅनर फाडू नका, व्यवस्थित, सावधानतेने काढावा. संपूर्ण शहरात हे काम करावे. फुटपाथवरील फलक काढण्यासाठी संबंधिताला अगोदर संधी द्यावी आणि सक्त ताकीदही द्यावी.

तरीही फलक काढला नाही. तर, पालिकेने तो काढावा, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत. दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे प्रशासन फलक काढण्याचे धाडस करणार का हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.