Vadgaon Maval : स्वर्गीय पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे रविवारी सामुदायिक विवाह सोहळा

एमपीसी न्यूज –  स्वर्गीय पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि.२८) सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी दिली.  

प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली ६ वर्षांपासून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम राबविला जात असून आतापर्यंत सुमारे ७५ जोडप्यांचे विवाह झाले आहेत. या वर्षीच्या सोहळ्यामध्ये १८ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यासाठी सुमारे १० ते १२ हजार वऱ्हाडी मंडळींसाठी बसण्याची व भोजनाची व्यवस्था, भव्य मंडप, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी ११.३० वा. साखरपुडा समारंभ यानंतर हळदी व भोजन समारंभ, दुपारी ३.३० वा. नवरदेवांची भव्य मिरवणूक व सायंकाळी ५.४० वा. शुभविवाह संपन्न होणार आहे.

सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक जोडप्याला गॅस कनेक्शन, संसारपयोगी भांडी तसेच, वधू, वरांना शुभविवाह साठी लागणारे संपूर्ण पोशाख, साड्या, वधूना चांदीचे अलंकार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे. याशिवाय भाग्यवान वधूसाठी एक दुचाकी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी केले असून सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी अविनाश कुडे, सतीश तुमकर, सुनील शिंदे, सुनील दंडेल, सोमनाथ धोंगडे, बंटी वाघवले, मंगेश खैरे, संभाजी येळवंडे, अरुण वाघमारे, काशीनाथ भालेराव, विवेक गुरव आदिंसह सर्व संचालक संयोजन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.