Talegaon : हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाचा मुजोरीपणा; भरलेली फी परत मागणा-या पालकांशी बोलण्यास शाळेचा नकार

एमपीसी न्यूज – एक पाल्य शाळेत शिकत आहे. त्याच शाळेत दुस-या पाल्यासही टाकावे, या विचाराने पालकांनी दुस-या मुलाचा शाळेत प्रवेश केला. मात्र कौटुंबिक समस्यांमुळे त्यांना दुस-या पाल्याचा प्रवेश कायम करता आला नाही. त्यामुळे भरलेली फी पालकांनी शाळेकडे परत मागितली असता फी मिळणार नसल्याची भाषा वापरत शाळा व्यवस्थापनाने फी परत देण्यास नकार दिला. तसेच पालकांशी बोलण्याचे सौजन्य देखील शाळेने दाखवले नाही. हा प्रकार सोमाटणे फाटा येथील हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. त्यांनी मध्यस्थी करत तळेगाव पोलीस, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केला. त्याचबरोबर शाळेला कायदेशीर नोटीस देखील पाठवली. मात्र शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकाराला जुमानले नाही. ‘कुणाकडेही गेलात तरी फी परत मिळणार नाही’ अशा भाषेत बोलून शाळा व्यवस्थापनाने समस्त पालक वर्ग आणि अन्य सर्व घटकांचा अवमान केला आहे.

प्रदीप नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील रहिवासी गणेश मराठे यांचा एक मुलगा (कुमार) सोमाटणे फाटा हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचा लहान भाऊ कार्तिक याचा पुढील शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्गासाठी प्रवेश घ्यायचा आहे. गणेश यांनी याच शाळेत प्रवेश घ्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी कार्तिकचा पहिल्या वर्गातील प्रवेश निश्चित केला. शाळेने पहिल्या वर्षासाठी मागितल्याप्रमाणे गणेश यांनी 30 हजार रुपये जमा केले. मात्र, गणेश यांना कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींमुळे कार्तिक याचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे गणेश यांनी २४ तासाच्या आत शाळेशी संपर्क साधून प्रवेश रद्द करायचा आहे. प्रवेशासाठी भरलेली फी परत मिळण्याची विनंती केली. शाळा प्रशासनाने ‘एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नसल्याचे’ छापील उत्तर गणेश यांना दाखवले. गणेश मराठे आणि प्रदीप नाईक यांनी शाळेच्या प्राचार्यांशी बोलण्याची विनंती केली. मात्र प्राचार्य कोणाशीही बोलत अथवा भेटत नाहीत, असे उत्तर मिळाले. त्यामुळे मराठे यांनी तळेगाव पोलिसात धाव घेतली. त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांच्याकडे मदतीची याचना केली.

शिक्षणाधिका-यांनी फी परत मिळायला हवी, असे संकेत दिले. त्यामुळे वकिलामार्फत शाळेला कायदेशीर नोटीस देखील पाठवली. यातील सर्व प्रयत्नांना शाळेने केराची टोपली दाखवली. यामुळे हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाने पालकांची आर्थिक फसवणूक व छळ करत असल्याचे स्पष्ट होत आहे. शाळेने पालकांची आर्थिक फसवणूक बंद करावी, तसेच मराठे यांनी भरलेली फी त्यांना परत मिळावी, अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

या सर्व प्रकरणाबाबत शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही, यामुळे शाळेची बाजू समजू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.