Vadgaon Maval News : पंचायत समितीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका (वाचनालय) सुरू

एमपीसी न्यूज : पंचायत समितीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका (वाचनालय) सुरू करण्यात आली असून, पुढील काळात तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये या अभ्यासिका सुरू करण्यात येतील अशी माहिती सभापती निकिता घोटकुले यांनी दिली आहे. 

पंचायत समितीमध्ये सुरू केलेल्या या अभ्यासिकेचे उदघाटन माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती निकिता घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मावळ भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, गटविकासाधिकारी सुधीर भागवत, माजी सभापती विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती विद्यमान सदस्य शांताराम कदम, सुवर्णा कुंभार, जिजाबाई पोटफोडे, साहेबराव कारके, जयश्री राऊत, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतागडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल भोईर, मनोहर कांबळे, बाळासाहेब दरवडे, बाळासाहेब वायकर, महादेव कारंडे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने अभ्यासिका सुरू केल्याची माहिती गटविकासाधिकारी भागवत यांनी दिली.

सभापती निकिता घोटकुले यांनी सांगितले की, आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात अभ्यासिका सुरू करण्यात येतील.

2020 – 21 च्या अंदाजपत्रकात या नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश केला असून चांदखेड, गोवित्री, राजपुरी, कामशेत, निगडे, उर्से, सुदवडी, वाकसई, कुसगाव बुद्रुक, काले या अकरा गावात अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी दिली. या अभ्यासिकेत एमपीएससी, युपीएससी या परिक्षांप्रमाणेच इतर नोक-यांसंदर्भातील पुस्तके, कांदब-या, थोर विचारवंताचे जीवनचरित्र आदी पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहे असेही शेवाळे यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवक व युवतींना या योजनेचा लाभ घेऊन  स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे, असे आवाहन केले. पदाधिका-यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून किमान दहा पुस्तके या वाचनालयांना भेट द्यावीत अशी सुचनाही भेगडे यांनी यावेळी केली.

प्रास्ताविक गटविकासाधिकारी सुधीर भागवत यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी विठ्ठल भोईर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.