Kalewadi News : पोलिसांच्या निषेधार्थ तक्रारदाराने चक्क केले मुंडन

एमपीसी न्यूज – दुकानाची तोडफोड झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या तक्रारदाराला पोलीस चौकीत पाठवण्यात आले. तिथून पुन्हा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. तक्रार करण्यासाठी तक्रारदाराला अशी पायपीट करावी लागल्याने पोलिसांच्या या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ तक्रारदाराने मुंडन केले. दरम्यान पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेतली आहे.

उमेश अर्जुन लोहार (वय 34, रा. थेरगाव) असे या तक्रारदाराचे नाव आहे. मेन रोड काळेवाडी येथे श्रीराम कम्युनिकेशन्स नावाचे लोहार यांचे दुकान आहे. रविवारी (दि. 28) रात्री लोहार त्यांच्या दुकानात काम करत असताना साडेआठ वाजताच्या सुमारास एका अनोळखी इसमाने त्यांच्या दुकानाची काच फोडली. काच फोडल्यानंतर आरोपी पळून गेला. लोहार यांचा परिसरात कुणाशीही वाद नसून विनाकारण हा प्रकार झाला असल्याचे लोहार यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

घडलेल्या प्रकाराबाबत लोहार तक्रार देण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात गेले असता तिथून त्यांना काळेवाडी पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. चौकीतून पुन्हा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. याचा लोहार यांना नाहक त्रास झाला. या परिसरात मागील तीन ते चार दिवसांमध्ये तोडफोडीच्या काही घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठराविक वेळेमध्ये गस्त घातली जात नसल्याचे लोहार म्हणाले. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोहार यांनी मुंडन केले आहे.

वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, ‘तक्रारदारांना नाहक त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. उमेश लोहार यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणाची माहिती घेत आहे. त्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल. परिसरातील गुन्हेगारी कुरापती कमी करून शांतता राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.