Dapodi: तरुणीची छेड काढत असल्याची तक्रार घर मालकिणीकडे केल्याने भाडेकरूकडून मारहाण

complained to landlord about molesting the girl beaten by tenant in dapodi

एमपीसी न्यूज- भाडेकरूचा मुलगा आपल्या मुलीची छेड काढत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी घर मालकिणीकडे केली. यावरून तक्रारदारास भाडेकरूने बेदम मारहाण केली.

ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शाहू कॉलनी, दापोडी येथे घडली.

आनंदा शिवाजी केंगार (वय 39, रा. शाहू कॉलनी दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी कांबळे, रोहन कांबळे, सोहम कांबळे (सर्व रा. शाहू कॉलनी, दापोडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहू कॉलनी येथे सुनीता अडसूळ यांच्या रूममध्ये भाड्याने राहतात. आरोपी शिवाजी कांबळे याच्या मुलाने फिर्यादी आनंदा यांच्या मुलीची छेड काढली.

याबाबत फिर्यादी आनंदा आणि त्यांच्या पत्नी सुरेखा यांनी आरोपी शिवाजी याच्या घर मालकिणीकडे तक्रार केली.

शिवाजी याचा मुलगा आनंदा यांच्या मुलीची छेड काढत असल्याचे घर मालकिणीला सांगून आनंदा आणि त्यांच्या पत्नी घरी परतत असताना आरोपी शिवाजी याने आनंदा यांच्या पायावर लाकडी बॅटने मारून जखमी केले.

त्यानंतर शिवीगाळ करत आनंदा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी शिवाजी यांचा मुलगा रोहन कांबळे याने लाकडी काठीने आनंदा यांच्या डोक्यात मारले. तर सोहम कांबळे याने दगडाने आनंदा यांच्या डोक्यात मारून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like