Dehuroad News : पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुनही मिळेना न्याय !

प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांकडून दबाव ; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह पीडित तरुणाचा उपोषणाचा इशारा

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील रोहित रोकडे शिवीगाळ व मारहाण प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्सटेबल हनुमंत भोसले यांच्यावर आणि प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्यावर कर्तव्यात कुचराई आणि अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे. न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुनही न्याय मिळत नसल्याने येत्या 29  जानेवारीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती रमेशन यांनी दिली.

यासंदर्भात रमेशन यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन पाठविले आहे.

देहूरोड येथील रोहित मिलिंद रोकडे हा तरुण मित्रासह पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या गस्तीवरील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भोसले यांनी रोहितला ‘इथे काय करतो’ असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर रोहित त्याला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी स्वतः देहूरोड पोलीस ठाण्यात गेला.

मात्र, तिथेही त्याला वाईट अनुभव आला. त्याची तक्रारही नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे शेवटी रोहित याने पोलीस आयुक्तांकडे ई मेलद्वारे तक्रार केली.

त्याची दखल घेत पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या तक्रार अर्जाची चौकशी सुरु झाली. हा अर्ज चौकशीसाठी सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्याकडे आला. मात्र, त्यांनी चौकशी करण्यास उशीर केला. तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भोसले यांना वाचविण्यासाठी रोहितवर दबाव टाकून प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले. रोहितने दिलेला जबाब न घेता स्वतःच्या मर्जीप्रमाणे रोहितला जबाब देण्यासाठी अटकेची कारवाई करण्याची धमकी दिली.

त्यामुळे शाहिद पठाण आणि हनुमंत भोसले या दोघांनी कर्तव्यात कुचराई आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप श्रीजित रमेश यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. त्याचबरोबर या दोन्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी 29 जानेवारीला पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही रामेशन यांनी निवेदनात दिला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गस्तीवरील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भोसले यांना रोहित रोकडे आणि दाभोळे हे दोघे जण पहाटे तीनच्या सुमारास रस्तालगत उभे राहून सिगारेट ओढताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी ‘एवढ्या पहाटे इथे काय करता, घरी जा’, असे सांगितले.

त्यावर रोहित याने सिगारेटचा धूर कांबळे यांच्या तोंडावर सोडला आणि आम्ही राजकीय पक्षाशी संबंधित आहोत, असे कांबळे यांना सांगितले. त्यामुळे रोहितवर रीतसर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने केलेल्या तक्रारीनुसार सध्या चौकशी सुरु आहे. त्यामुळे कुणाला वाचविण्याचा आणि रोहितवर दबाव टाकल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले.

तर श्रीजित रमेश म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असतात. निरपराध तरुणावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नव्हे. रोहितवर अन्याय झाला आहे. त्याने न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याने प्रकरण मिटविण्यासाठी चौकशीला जाणूनबुजून उशीर करण्यात येत आहे. शिवाय रोहितने दिलेला जबाब नोंदविण्यास नकार देण्यात आला आहे.

पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील निरीक्षकांवर कारवाई केली आहे. अशीच कारवाई शाहिद पठाण आणि हनुमंत भोसले यांच्यावरही करावी, या मागणीसाठी मी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, रोहित रोकडे याने आपल्यावर चुकीची कारवाई झाल्याचे पुन्हा एकदा सांगतले. मी माझ्या घरासमोर थांबलो होते. पोलिस कर्मचाऱ्यासोबत कोणतेही गैरवर्तन केलेलं नाही. उलट त्यांनीच शिवीगाळ करुन मारहाण केली. मी स्वतः तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता मला वाईट वागणूक देण्यात आली. तिथेही शिवीगाळ करून जमिनीवर बसण्यास सांगितले. त्यामुळे मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतरही न्याय मिळत नाही. उलट प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकला जात आहे. माझा जबाबही मी सांगितल्याप्रमाणे नोंदवून घेतला जात नाही. त्यामुळे मी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. मीही त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.