Pimpri News: ‘सारथी’वरील तक्रारींचे टोकन मिळेना!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी वरदान ठरत असलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनवरील तक्रारींचे टोकन मिळणे बंद झाले. मागील काही दिवसांपासून टोकन येणेच बंद झाले आहे त्यामुळे तक्रारींचे निराकरण होत नाही. तक्रार निकाली निघाली की नाही याची माहिती देखील समजत नाही, त्यामुळे टोकन देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा/सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत हेल्पलाईन (कॉल सेंटर) ही सुविधा तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2013 रोजी सुरू करण्यात आली आहे. ‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा 24 तास आठवड्यातील सातही दिवस नागरीकांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती फोनवरून उपलब्ध होते.

सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरते. या हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर त्याचे टोकन येणे अतिशय महत्वाचे आहे. तक्रार कोणत्या टप्प्यात आहे, ती निकाली निघाली आहे का, याची माहिती टोकनवरून घेता येते, यासाठी टोकन मिळणे महत्वाचे आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून टोकन मिळणेच बंद झाले आहे, त्यामुळे तक्रार निकाली निघाली आहे की नाही हे नागरिकांना समजत नाही. याचे गांभीर्य लक्षात घेता टोकन देणे तत्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, “सारथी हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींचे टोकन मिळत आहे. आज सकाळीच मला टोकन मिळाले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.