Chakan : खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल

शिवसेनेचे अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन

एमपीसी न्यूज- पुणे-नाशिक महामार्गावरील अवैध प्रवासी वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने शिवसेनेने रविवारी (दि.26) रात्री खळ्ळ खट्याक… आंदोलन करीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक अवैध प्रवासी वाहने फोडली. पोलिसांनी या प्रकरणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांवर बेकायदा जमाव जमवून हाणामारी केल्याचा गुन्हा सोमवारी (दि.27) रात्री उशिरा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अवैध प्रवासी वाहन चालकाची तक्रार घेतली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान या गुन्ह्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांनी लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असला तरी अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

मागील महिनाभरापासून पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकण दरम्यान होत असलेली वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नव्हती. अवैध प्रवासी वाहने रस्त्यावरून हटण्यास तयार नसल्याने व पोलीस अशा वाहनांवर केवळ कागदोपत्री कारवाईचे सोपस्कार करीत असल्याने अखेर रविवारी (दि.२६) रात्री साडेआठच्या सुमारास शिवसेनेने खळ्ळ खट्याक… आंदोलन करीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक अवैध प्रवासी वाहने फोडली.

पुणे नाशिक महामार्गावर येथील तळेगाव चौकात, आबेठाण चौकात दस्तुरखुद्द आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे अवैध प्रवासी वाहने चालविणाऱ्या मंडळींनी वाहनांसह चौकांमधून पोबारा केला होता. पोलिसांनी संबंधित अवैध वाहनांवर कारवाई न करता आमदार सुरेश गोरे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाची पोलिसांनी तक्रार घेतली असून त्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पोलिसांनी या बाबत गोपनीयता पाळली असून चाकण पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांनी गुन्हा दाखल असल्याचे सांगितले मात्र अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

दरम्यान, आमदार सुरेश गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कुणालाही मारहाण करण्यात आलेली नसताना मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल होऊ शकत नाहीत. अवैध प्रवासी वाहतुकीत पोलिसांचे हात बरबटलेले असल्याने खोटे तक्रारदार पुढे करून अवैध वाहतुकीचा गोरख धंदा चालविण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.