Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केल्याप्रकरणी एका पोलिस निरीक्षकाची निवडणूक आयुक्त आणि पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली. शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असणाऱ्या शिक्रापूर येथील हा प्रकार आहे. 

येथील ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लढविणाऱ्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या विरोधात ही तक्रार दिली. उमेश तावसकर  यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील उमेदवारांना मदत करत असल्याचा आरोप भैरवनाथ ग्राम ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी केला आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचारसभा नेहमी भैरवनाथ मंदिरासमोरील जागेत होतात. त्यानुसार भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

उमेश तावसकर हे भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांवर दबावतंत्राचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करत आहेत. कार्यकर्त्यांना शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक देऊन दमदाटी करत असल्याची लेखी तक्रार भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.