Talegaon Dabhade News : महत्वाची प्रलंबित कामे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करा; आमदार सुनील शेळके यांचे अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश

एमपीसी न्यूज – महत्वाची प्रलंबित विकास कामे येत्या 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करा, असे आदेश आमदार सुनील शेळके यांनी संबधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांना दिले आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषदेसाठी ठराविक वेळ देऊन कामे पूर्ण करणार आहे. तसेच शासनाकडून अधिकाधिक निधी आणणार असल्याचे आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तळेगाव नगरपरिषदेच्या विकास कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक किशोर भेगडे, गणेश काकडे, गणेश खांडगे, अरुण माने, संदीप शेळके,मुख्याधिकारी सतीश दिघे, नगर परिषदेचे विविध खाते प्रमुख, शासकीय अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषदेची प्रलंबित कामे घन कचरा व्यवस्थापन,भुयारी गटर योजना, शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणी योजनेतील नवीन जल वाहिन्या टाकण्याची कामे या कामाचा अधिका-यांकडून आढावा घेऊन त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असे शेळके यांनी यावेळी सांगितले.

शहरातील सर्व कामे चालू असलेले रस्ते एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण करून घ्यावे. तसेच या पुढे शहरातील सर्व शिल्लक रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय नगर परिषदेचे नूतन कार्यालयाचे काम त्वरीत हाती घेणार आहे.तसेच तळेगाव चाकण रस्ता रुंदीकरण व त्यामध्ये येणा-या विजेच्या खांबांची अडचण नगर परिषद प्रशासनाने त्वरित दूर करावी. अशा सूचना शेळके यांनी केल्या.

नगर परिषदेची विकास कामे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस नगर परिषद कार्यालयात येणार आहे. तसेच आगामी विकास कामाचे प्रस्ताव नगर परिषद प्रशासनाकडून घेऊन जास्तीत जास्त निधी शासनाकडून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार.

तळेगाव शहरातील विविध रस्त्यावर विविध ठिकाणी बसणा-या व्यावसायीकांना रस्त्यामध्ये अडथळा होणार नाही अशा  ठिकाणी त्यांची व्यवस्था करणार, नगर परिषदेच्या हद्दीबाहेर आलेल्या इंद्रपुरी या वसाहतीतील रस्ते,पाणी लाईट या मुलभूत सुविधा प्राप्त करून देण्यातही मोठा निधी उपलब्ध करून देणार. शहरातील रस्त्यामध्ये  रिक्षांचा अडथळा होणार नाही अश्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ उभारून देणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.