Nigdi News : महात्मा बसवेश्वर यांच्या शिल्पाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या शिल्पाचे काम अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करावे. या शिल्पाचे लवकरात-लवकर अनावरण करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, निगडी प्राधिकरण येथे महापालिकेच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा, महादेवाची पिंड यासाठी लागणा-या चौथा-याचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आहे. या चौथर्‍यावर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळाही बसविण्यात आलेला आहे. समोर महादेवाची पिंड बसवण्यात आलेली आहे; मात्र महात्मा बसवेश्वर व महादेवाची पिंड प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्यात आलेली आहे.

समोर देखणी सूर्यकमान उभारण्यात आली आहे. या सूर्यकमानीतून महादेवाची पिंड व महात्मा बसवेश्वर यांचे दर्शन नागरिकांना होणार आहे. मात्र या भागाच्या वॉलकंपाऊंड व शिल्पाच्या मागील पुढील भागाचे सुशोभीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे हे शिल्प जवळ-जवळ पूर्ण झालेले असतानाही त्याचे अनावरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळलेले आहे.

त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून राहिलेली छोटी-मोठी कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. त्याच बरोबर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून या शिल्पाचे अनावरण करावे. हे काम पूर्ण करुन अनावरण लवकर झाले नाही. तर, आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल, असा इशाराही भापकर यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.