Pune : प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असताना, हॅकर्सचेही आव्हान – एअरमार्शल भूषण गोखले

सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप

एमपीसी न्यूज – “राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सायबर सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय झाला आहे. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनीही निरनिराळे गॅजेट आणि संगणक प्रणालीचा काळजीपूर्वक वापर करायला हवा. त्याचे चांगले-वाईट उपयोग आहेत समजून घ्यावेत. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या उपलब्धी असताना, हॅकर्सचेही आव्हान आपल्यासमोर आहे, ” असे मत एअरमार्शल भूषण गोखले यांनी केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपा वेळी गोखले बोलत होते. ‘सुर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या राष्ट्रीय परिषदे वेळी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, सायबर सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा, सायबर कायदेतज्ज्ञ ऍड. राजेश पिंगळे, सायबर तज्ज्ञ ऍड. प्रशांत माळी, संदीप गादिया, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, संचालक डॉ. शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.

सायबर हल्ल्यांविषयी प्रगत राष्ट्रांनाही चिंता वाटत आहे. सीमा आणि शस्त्रांशिवाय असलेला हा लढा गंभीर आहे. इथे शत्रू ओळखण्यास वेळ लागतो. भविष्यात युद्ध झालेच, तर ते सायबर आणि स्पेसच्या माध्यमातून होईल. ‘सायबर वॉर’ची अनेक उदाहरणे आपण याआधीही पाहिली आहेत. यावेळी संभाजी कदम, ऍड. प्रशांत माळी, संदीप गादिया यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

दत्तात्रय शेकटकर म्हणाले, “वाढती सायबर गुन्हेगारी आव्हानात्मक बनली आहे. विविध सोशल नेटवर्ककींग साईट्स, मोबाईल ऍप्समुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण त्याच्या आहारी जात असून, इंटरनेट बंद पडले की आपले सर्व काम थांबते, अशी स्थिती आहे. येत्या काळात मोबाईल फोन मानवापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. काही मुलांकडे दोन-तीन मोबाईल असल्याचे दिसते. हे चुकीचे असून, इंटरनेटचा गरजेपुरता वापर व्हावा. भारतीय भूमीवर खूप बुद्धीमानी लोक जन्माला येतात. त्यांच्या बुद्धीची अमेरिकेसारख्या देशालाही भीती वाटते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करून अभ्यास-वाचन करण्यावर भर दिला पाहिजे.”

संभाजी कदम म्हणाले, “जगाच्या कान्याकोपऱ्यात बसून अनकेजण ऑनलाईन फसवणूक करत आहेत. त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. त्यासाठी सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग अश्या गोष्टीचा वापर करताना काळजी घ्यावी. तसेच देशात बँकिंग फसवणूक वाढत चालली आहे. प्रत्येकाने आपली बँकेसंबंधित वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नये.  फक्त इंटरनेट आणि कॉम्प्युटरची गरज असल्यामुळे सध्या ‘फिजिकल’ गुन्हेगारीपेक्षा ‘व्हर्चुअल’ गुन्हेगारी वाढत आहे.

सध्या सोशल मीडियावर इतरांचे प्रोफाइल हॅक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आपले प्रोफाईल हॅक होऊ नये, यासाठी आपल्याला येणाऱ्या फसव्या ईमेल आणि मेसेजवर करडी नजर ठेवावी. लाखो रुपयाच्या लॉटरीचे अमिष दाखवले जाते. ऑनलाइन शॉपिंगवेळी आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती वेबसाईटवरून चोरली जाऊ शकते. याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येकाने इंटरनेट आणि सोशल साईट्स वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.”

डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा म्हणाले, “सायबर गुन्हा करणारे हॅकर इतर देशांत असून आर्थिक, मानसिक फसवणूक करतात. त्यामुळे त्यांना पकडणे खूप कठीण असते. त्यात्या देशाचे संरक्षणविषयक धोरण ठरलेले असते, त्यामुळे आपल्या पोलिसांना जाऊन त्यांना पकडणे अवघड जाते. फसवणूक झालेल्या व्यक्तीला लवकर न्याय मिळत नाही.

यासाठी आपण त्यांना बळी पडू नये. भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्याचपद्धतीने स्वच्छ सायबर अभियान राबवणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची सजगताच आपल्या सर्वाना सुरक्षित ठेवू शकते.”

ऍड. प्रशांत माळी म्हणाले, “मोबिफिया नावाचा रोग सध्या जोमात आहे. सतत मोबाईल हातात असणे, त्याचा वापर करत राहणे, यामुळे हा रोग झाला आहे. अनकेजण मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहण्यात घालवतात, वेगवेगळ्या साइटवरून लिंक ओपन होताना दिसतात आणि त्या लिंकमध्ये पैसे भरण्यासाठी सांगितले जाते. त्यातून आपली आर्थिक लूट केली जाते. पॉर्न व्हिडिओ मोबाईलमध्ये ठेवल्यास कायद्याने गुन्हा ठरतो. तसेच १८ वर्षाखालील मुलींचे व्हिडिओ पाहत असाल किंवा आपल्या मोबाईलमध्ये ठेवाल, तर सात वर्ष कैद आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे चित्रफिती पाहताना किंवा साठवून ठेवताना आपण विचार करणे गरजेचे आहे.”

संदीप गादीया म्हणाले, “मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या ठिकाणाच्या डिजिटल फूटप्रिंट उमटलेल्या असतात. आपण कुणाच्या तरी निगराणीखाली असतो. ‘गुगल’कडे आपली प्रत्येक माहिती आहे. आपल्या फिरण्या-खाण्याविषयी, काय करतो त्याविषयी अशा सर्व हालचालींवर ‘गुगल’चे लक्ष आहे. बऱ्याचदा इतरांचा मोबाईल, कॉम्प्युटर घेतो, हे कायद्याने गुन्हा आहे.

नायजेरियन फ्रॉडमध्ये लॉटरी लागल्याचे सांगून फसवले जाते. यामध्ये सर्वात जास्त भारतीयांची फसवणूक होत आहे. नासासारख्या जागतिक संस्थानाही सायबरचा फटका बसला आहे. रशियाच्या हॅकरने त्यांच्या सॅटेलाईटची दिशा बदलली होती. त्यामुळे सायबर धोका किती मोठा आहे याची प्रचिती येते.”

माहिती तंत्रज्ञान कायद्यांनुसार सर्व कर्मचाऱ्यांची माहिती सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. अनेक कंपन्या ही माहिती सुरक्षित ठेवण्यावर भर देतात. माहितीची सुरक्षा न जपणाऱ्या कंपनीवर कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रत्येक कंपनीने सुरक्षेचे लेखापालन करणे गरजेचे आहे.

पायरेटेड सॉफ्टवेअर, व्हिडिओ किंवा इतर कोणत्याही गोष्टी बाळगणे कायद्याने गुन्हा असून, सायबर हल्ल्याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. एखाद्या महिलेला अश्लील मेसेज केला, तरी तो गुन्हा ठरतो, असे सांगत ऍड. राजेश पिंगळे यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमे, सुरक्षेचे उपाय याविषयी माहिती दिली.

जयराम पायगुडे म्हणाले, “आपल्या इमेल आणि फेसबूक व इतर सोशल साईट्सना ‘कॉमन’ पासवर्ड देतो. त्यामुळे हॅकरला तुमचे अकाउंट हॅक करायला सोपे जाते. पासवर्ड टाकताना नवीन ट्रिक्स वापराव्यात. अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आपल्याबद्दलची खासगी माहिती कोणालाही न देणे हेच अधिक चांगले असते. ग्रुप आणि सोशल मीडियावर माहिती टाकू नका. फेक अकाउंट्स ओळखून त्याची तक्रार करा.”

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “लहानथोर सगळेच मोबाईल, इंटरनेटच्या आहारी गेल्याचे आपण पाहतो. त्यातून घडणाऱ्या घटना पाहिल्यावर मन विषण्ण होते. त्यामुळे प्रगत तंत्राचा वापर करताना नेमकी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि समाजाला व्हावे, या उद्देशाने सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.