Pune : ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 22व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा समारोप

रथितयश कलाकारांचे गायन आणि वादनाने रंगली सुरेल सायंकाळ ; संगीततज्ज्ञ पंडित डॉ. विकास कशाळकर यांचा ब्रह्मनाद पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज : जगविख्यात शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांच्यासह पंडित संजय गरुड, शास्त्रीय गायिका डॉ. रेवती कामत यांचे गायन आणि युवा संतूरवादक डॉ. शंतनू गोखले यांच्या वादनाने धायरीकरांनी आज सुरेल सायंकाळ अनुभवली.

Pimpri : सूरराज गुरुकुलतर्फे ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क ‘ विषयावर कार्यशाळा संपन्न

त्याच बरोबरीने शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीततज्ज्ञ पंडित डॉ. विकास कशाळकर यांना ब्रह्मनाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य.

धायरी या पुण्यातील (Pune) उपनगरात गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून शास्त्रीय संगीताची बीजे रुजविणाऱ्या ब्रह्मनाद कला मंडळातर्फे 22व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (दि. 28) सुरुवात डॉ. रेवती कामत यांनी राग मुलतानीतील ‌‘बनवास चले श्री राजाराम‘, ‌‘रे भज मन रामनामआणि ‌‘अवध नगरिया सुनीया गुरू अश्विनी भिडे देशपांडे यांच्या रचना सादर करून केली.

संत ज्ञानेश्वर महाराज रचित ‌‘रूप पाहता लोचनीहे भजन सादर करून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. निलेश रणदिवे (तबला), शांतिभूषण देशपांडे (हार्मोनियम), तेजा जोशी, नम्रता लिमये, गायत्री कामत (तानपुरा-सहगायन) यांनी साथसंगत केली.

यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य, युवा संतूरवादक डॉ. शंतनू गोखले यांनी राग पूरिया कल्याणमधील आलाप, जोड-झाला, नऊ मात्रांचा मत्तताल आणि द्रुत तीनताल सादर करून रसिकांची मने जिंकली. निलेश रणदिवे यांनी तबला साथ केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजक पंडित संजय गरुड यांनी राग मारुबिहागमधील ‌‘रसिया हो ना जाओआणि द्रुत तालात ‌‘तडपत रैना गिरीया बंदिशी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित गरुड यांच्या बहारदार ताना, दमदार आवाज याला रसिकांनी मनमुराद दाद दिली. त्यानंतर पंडित गरुड यांनी ‌‘आरंभी वंदिन अयोध्येचा राजा‘, ‌‘माझे माहेर पंढरी‘, ‌‘तुका आकाशा एवढाहे अभंग सादर करून संतवाणीची झलक दाखविली. प्रशांत पांडव (तबला), शांतिभूषण देशपांडे (हार्मोनियम), ज्योती साठे, रुपाली माहुरे (तानपुरा), अमर काळे, दिनेश माझिरे (सहगायन) यांनी साथसंगत केली.

दोन दिवसीय महोत्सवाची सांगता किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित डॉ. अजय पोहनकर यांच्या संगीत मैफलीने झाली. पंडित डॉ. पोहनकर यांनी मैफलीची सुरुवात धु्रपद अंगाने सादर केलेल्या राग दरबारीतील ‌‘किन बैरन कान भरेया बंदिशीने केली. त्यानंतर पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर

(की-बोर्ड) यांनी पहाडी रागातील ‌‘सैया गये परदेसहे फ्युजन सादर करून रसिकांना अचंबित केले. मैफलीची आणि महोत्सवाची सांगता पंडित पोहनकर यांनी भैरवी रागातील ‌‘बाजूबंद खुल खुल जाएया ठुमरीने केली. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शुभम खंडाळकर (सहगायन), आदिनाथ धुमाळे, केदार रोडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कलाकरांचा सत्कार प्रदीप जोशी, योगेश्री सुभेदार, कृष्णा तेलंग, पांडुरंग मुखडे, उमेश पोकळे, अक्षय गनगोटे, सुभाष चाफळकर, विभास अंबेकर, ज्योती ताटे, रुपाली माहूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

डॉ. विकास कशाळकर यांचा दादाजी वेदक यांच्या हस्ते ब्रह्मनाद पुरस्काराने गौरव

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या पंडित डॉ. विकास कशाळकर यांना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादाजी वेदक यांच्या हस्ते ब्रह्मनाद पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायक पंडित उल्हास कशाळकर, पंडित राजा काळे, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, शीला देशपांडे, महोत्सवाचे आयोजक पंडित संजय गरुड, बापूसाहेब पोकळे, सुभाष चाफळकर स्वरमंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सत्काराला उत्तर देताना पंडित विकास कशाळकर म्हणाले, भौतिकतेकडून मोक्षाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे संगीत असते. गायकाला एकांतात संगीताशी एकरूपता साधल्यानंतर ब्रह्मनादाची अनुभूती येते. ब्रह्मनाद कला मंडळातर्फे ब्रह्मनाद या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद वाटतो.

दादा वेदक म्हणाले, शास्त्रीय संगीत हा भारताचा अनमोल ठेवा आहे. संगीत ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. मानवाला ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी सत्संग आणि संगीताचा सर्वात जास्त उपयोग होतो. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.