एकवीस की वीस एक….. ? लईच गोंधळ जणू !

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- रस्त्यातून जात असताना शालेय पुस्तकाचं दुकान दिसल. मुलांची आणि त्यांच्या पालकांची तिथे खूपच गर्दी होती. खूप मस्त वाटत होत. सहज आत गेलो तर एक ओळखीचे पालक भेटले. त्यांची छकुली आता दुसरीत गेली. त्या मुलीच्या आईने मला दुसरीच गणिताच पुस्तक हातात दिल. ते वाचत असताना शिक्षकांसाठी सूचना अस काहीसा लिहिलेला मजकूर मला आढळला. इथून पुढे जोडाक्षरांचा मुलांना त्रास होऊ नये म्हणून एकवीस ऐवजी वीस एक, वीस दोन असा बदल केला गेलेला आहे हे वाचून जरासा चक्रावूनच गेलो.

साहजिकच मला माझे दुसरीतले दिवस आठवले .मराठीच्या आणि गणितातल्या बाई (त्या काळी सगळ्या विषयाच्या एकच शिक्षिका असायच्या ) जोडाक्षर आम्हाला अगदी तल्लीन होऊन शिकवायच्या. शुद्ध भाषा येण ही त्या काळातली एक मुलभूत गरज होती (आजच्या काळात नसावी). तो काळ म्हणजे काही 1857 समजायचं काही कारण नाही. कुठलीही भाषा तुम्ही शिकलात तरी ती अगदी व्यवस्थितच आली पाहिजे. अगदी ग्रामीण मराठी सुद्धा जशी बोलली जाते तशीच असावी. त्याच्यातल निरागसपणा जपला गेला पाहिजे. आजकाल आम्ही भाषांची मिसळच करत असतो. आम्हाला त्याच काहीही वाटत नाही. बर ! ही मिसळ फारशी रुचकरही नसते. ना धड आम्हाला इंग्रजी येत, ना धड आमची मातृभाषा. सगळच गणित आमच चुकलेल !

ही अवस्था आमच्या सन्माननीय शिक्षण खात्याला वाटत नाही का ? कारण वीस एक यावर दिलेले स्पष्टीकरण म्हणजे इंग्रजी प्रमाणे सुटसुटीत करण्याचा संबंधितांचा प्रयत्न आहे. मग बाकीच्या राज्यातल्या इतर भाषिकांना अस वाटलच नसेल का ? त्यांची मुलं त्यांचाच भाषेत शिक्षण घेऊन मोठे होतात. त्यांना असा सुटसुटीत सोप्प करण्याचा नसता छंद नसावा बहुतेक. उदाहरणादाखल आपण हिंदीबद्दल बोलू ,कारण ती लिपीच्या दृष्टिकोनातून आपल्या जवळची भाषा आहे. हिंदी मध्ये एकवीसला इक्कीस म्हणतात. इक्कीस,बाईस, तेईस,चौबीस…… इत्यादी इत्यादी. तिथे अजून तरी बीस एक,बीस दो अस झालेलं नाही, तिथे जोडाक्षरही आहेत. मग आम्हालाच अस जगावेगळ सुचत कस, हा प्रश्न आहे. शिक्षणाचा स्तर म्हणाल तर तिथला स्तर काही वाईट नाहीये. आज सगळ्याच क्षेत्रांमध्ये हिंदी भाषिक आहेतच की पुढे. त्यांना गरज वाटत नाही हे असल्या सोपेपणाच्या कुबड्यांची. मग आम्हालाच का वाटते ?

दरवर्षी अस एखाद तरी उदाहरण असतच की धोरणात कुठेतरी गोंधळ असतोच, हे अत्यंत जवाबदारीने केलेलं विधान आहे. ते मी करत नाहीये तर बऱ्याचशा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचं हे मत आहे. काही नाही तर पुस्तकातील टंकलिखित चुका तर सवयीच्याच झाल्या आहेत .जे कोणी संबंधित असतात ते या गोष्टी होऊच नयेत यासाठी खबरदारी किती घेतात ? हा देखील प्रश्नच आहे.

असे प्रश्न विचारण्याची गरज असते. त्याशिवाय सुदृढ शिक्षणपद्धती जन्माला येत नसते. त्यामुळे एवढच सांगावस वाटत की उगाच शिक्षणाच्या सोपे करण्याच्या नादात नसता सावळागोंधळ करू नका. विद्यार्थ्यांना कमी समजू नका. तर त्यांना सकस शिक्षण कस मिळेल हे पाहायला हव. देशाच्या, जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर दिलेल्या आव्हानाचा सामना करण्याच बळ त्यांना तुम्ही- आम्ही द्यायला हव. सोप्प ,सोप्प करून त्यांना आयदी करू नका. की जोडाक्षर येत नाहीत म्हणून आम्ही आकड्यांची पद्धतच बदलतो. अस करू नका. जोडाक्षर नीट म्हणण्याची पद्धतही शिकवता येऊ शकते, त्यासाठी अनेक साध्या, सरळ आणि सोप्या पद्धती आहेत. त्या मुलांना शिकवाव्या. अजून काही पद्धती ही विकसित करता येतील. अशी आशा वाटते .एवढंच !!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.