Rasayani : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनतेपेक्षा स्वतःच्या मुलांच्या रोजगाराची चिंता – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरली. तरीही त्यांना सर्वसामान्य जनतेला रोजगार कसा मिळेल याची चिंता नाही. तर स्वतःच्या मुलांना कसा रोजगार मिळेल याची चिंता आहे, असा राष्ट्रवादीला टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला.

शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 26) मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, आरपीआयचे जगदीश गायकवाड, शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता दळवी, बाळासाहेब पाटील, बाबनदादा पाटील, महेश बालदी आदी उपस्थित होते.

सांगुरली ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, दीपक ठोंबरे, अनंता वाजेकर आणि त्यांच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.नितीन गडकरी म्हणाले, “पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या वतीने मनमोहन सिंग आणि आता राहुल गांधी हे सर्वजण केवळ गरिबी हटाओ हाच नारा देत आहेत. स्वातंत्र्यानंतर 55 ते 60 वर्ष त्यांचेच सरकार होते. मग या काळात नेमकी कोणाची गरीबी हटली, हा प्रश्न मला पडला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्या चेल्या-चपाट्यांची गरिबी हटवली आहे. ‘अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, राष्ट्रवादी काँग्रेसची गावोगाव रोजगार हमी’ असे भ्रष्ट धोरण त्यांनी राबवले आहे.जेएनपीटी मध्ये सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. रसायनीमध्ये इस्रो आणि बीपीसीएलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यातील 80 टक्के रोजगार स्थानिकांना मिळणार आहेत. जनतेच्या आग्रहाने उमेदवारी मिळायला हवी, पण राष्ट्रवादीचा उलटा कारभार आहे. त्यांनी आई-वडिलांच्या आग्रहाने मुलांना उमेदवारी दिली आहे. देशात विकास होतोय, बदल होतोय; याचे सर्व श्रेय मोदींना किंवा बारणे यांना नाही. तर याचे सर्व श्रेय जनतेला आहे. जनतेने विश्वास दाखवला म्हणून हे घडू शकले आहे. हाच विश्वास पुन्हा एकदा दाखवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणाले, “प्रतिस्पर्धी जनतेसमोर जात नाहीत. त्यांचा मनी मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. बारणे मागील पाच वर्षांपासून मावळ लोकसभा मतदारसंघाचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा वृत्तांत दिला आहे. विरोधकांची पाटी कोरी आहे. येत्या 29 तारखेला ती पाटी कोरीच ठेवायची आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी अखंड महाराष्ट्राला काय दिलं, हा प्रश्न आहे. त्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा महाराष्ट्राला दिला. हा पापाचा आणि शापाचा पैसा आहे. त्याला मावळची जनता हात लावणार नाही. पापात आणि शापात ही जनता सहभागी होणार नाही.

मावळ भागाला भेडसावणारे अनेक प्रश्न नितीन गडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोडवले आहेत. जेएनपीटी ते बुटीबोरी हा रस्ता सुरू आहे. राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गात बदलून त्यांचाही विकास सुरू आहे. अनंत कुमार यांनी कामगारांसाठी चांगला लढा देऊन त्यांच्या हितासाठी सक्रिय काम केले. नितीन गडकरी आणि अनंत गीते हे पुढच्या वेळी देखील केंद्रात मंत्री असणार आहेत. त्यामुळे रसायनी परिसराचे प्रश्न एनडीए सरकार सत्तेत येताच काही दिवसांमध्ये सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. 23 एप्रिल रोजी रायगड मधून राष्ट्रवादी काँग्रेसची रायगडमधून एक सुपारी कातरली आहे. आता 29 तारखेला मावळ मधून राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी सुपारी कातरून टाकू. विरोधकांची पुणे आणि रायगड ही दोन्ही संस्थाने खालसा करणार आहोत. गडकरी साहेब, विरोधक तुमच्याकडे आले तर त्यांना थारा देऊ नका, असा टोला देखील गीते यांनी राष्ट्रवादीला दिला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किमान 25 हजार मतांचे मताधिक्य मिळणार आहे. जनतेने बारणे यांच्या माध्यमातून विकासाला मत द्यावे.

“महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “2014 साली नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि देशातील प्रत्येक नागरिकाने चांगला बदल अनुभवला. देशाच्या नसा म्हणून ओळखले जाणारे रस्ते नितीन गडकरी यांच्यामुळे चांगले झाले. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत. केवळ आरोप प्रत्यारोप करून ते निवडणूक लढवत आहेत. विरोधकांनी केवळ भ्रष्टाचार करून देशाला लुटले आहे. ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना आणि विकासकामे मावळ मतदारसंघात आणल्या. रस्ते, वीज, पाणी, उद्योग, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील कामांची विकासगंगा मतदारसंघात आली आहे. देशाची प्रगती डोळ्यासमोर ठेऊन मतदारांनी विचार करून महायुतीला मत द्यावे.

“आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात विकासकामे झाली आहेत. 2014 पूर्वी रसायनी भागातील उद्योग बंद पडत होते. त्यांना नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्याने उभारी मिळाली. मागील पाच वर्षात या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत. यामुळे तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल आस्था आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने नितीन गडकरी यांच्यामुळे होऊ शकले. अनेक कामे वेगाने सुरू झाली. याचे सगळे श्रेय नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जाते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.