Pune News : मराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांनी आगी लावण्याची कामे करू नये : सचिन सावंत

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासंदर्भात राज्यसरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु खोट्या माहितीच्या आधारावर मराठा समाजात अफवा पसरविणे आणि अपप्रचार करून माथी भडकाविण्याची, आगी लावण्याची कामे भाजपच्या नेत्यांनी करू नये, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

पुणे काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहार, गोपाळ तिवारी उपस्थित होते.

सावंत म्हणाले,राज्यसरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या न्यायालयीन लढाईची भाजपला पोटदुखी आहे. अपप्रचार करणे खोट्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. मुळात भाजपमधील मराठा नेत्यांची आरक्षण देण्यासंदर्भात अनुकुलता नाही.

‘चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद’ म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले. छ. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात तीन वेळा पत्र पाठवली, भेटीची वेळ मागितली पण मोदींनी भेट दिली नाही याचा अर्थ केंद्र सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी अनुकूल नाही.

102 वी घटनादुरूस्ती मधील स्पष्टता केंद्र सरकारने करावी. त्यामुळे आरक्षणाचा खटला घटनापीटाकडे वर्ग झाला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशात विलंब होत असला तरी त्यांनी धीर ठेवावा, संयम बाळगावा, ही ऐतिहासीक लढाई आहे. भाजप मराठा आरक्षणावर राजकारण करत आहे. महाविकास आघाडी सरकार संवेदनशीलपणे न्यायालयीन लढाई लढत असल्याचा पुनरुच्चार सावंत यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.