Pune News : खासदार, आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्याकडून राळे कुटुंबियांचे सांत्वन

एमपीसी न्यूज  : सीमेवर वीरमरण आलेल्या संभाजी राळे यांच्या बहिणीने आपल्या बंधूप्रमाणे लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या या अतुलनीय बलिदानास सलाम करत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

अविवाहित असलेल्या कै. संभाजी यांचे यंदा लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब मनाला चटका लावणारी बाब आहे. या घटनेमुळे राळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातला एकमेव कर्ता पुत्र देशसेवा करताना गमावला गेला आहे. त्यामुळे मी तसेच आमदार मोहिते पाटील आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी असून राळे कुटुंबाला आमच्याकडून सर्व प्रकारची मदत करु, असा शब्द खासदार कोल्हे यांनी कुटुंबियांना दिला.

यावेळी कै. संभाजी यांच्या भगिनीने लष्करात भरती होऊन आपल्या बंधुप्रमाणे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आमदार मोहिते पाटील आणि मी त्यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन खासदार डॉ. कोल्हे यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळशेठ ठाकूर, रमेश राळे, अरुण चांभारे, माणिक कदम, अ‍ॅड. मनीषा पवळे, सुजाता पचपिंड, युवराज पडवळ, सचिन भोकसे, समीर राळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष निलेश काळे, नितीन भोकसे, दिगंबर कदम, सोशल मीडियाचे अध्यक्ष विलास मोहिते पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर वाडेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.