Pimpri News : शहरात संविधान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी केला.

महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, वामन नेमाणे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला.

भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प देखील यावेळी करण्यात आला.

दरम्यान, पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच या पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलेस देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला.

वाल्हेकरवाडी येथे संविधान सन्मान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन

वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक 17 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थ‍ितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभागाच्या माजी अध्यक्षा करुणा चिंचवडे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, भाजपा अनु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, उद्योजक निलेश भोंडवे, उद्योजक आदेश नवले, भाजपा कामगार आघाडीचे शंकर पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच साडे तीनशे हुन अधिक संख्येने नागरिक उपस्थ‍ित होते.

पिंपरीत अन्नदान

संविधान दिनानिमित्त पिंपरी विधानसभा परिसरामध्ये भाजपाच्या वतीने 3000 गरजू नागरिकांना अन्न दान करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, संभाजी नाईकनवरे, शेखर साळवे ,राम लोंढे,अमोल कूचेकर,प्रशांत शिंदे, राजू चौघुले व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.